पेट्रोल-डिझेलवर अवलंबित्व कमी करा, अन्यथा..; नितीन गडकरींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 17:50 IST2025-12-28T17:50:07+5:302025-12-28T17:50:27+5:30
Nitin Gadkari on Petrol-Diesel: पेट्रोल आणि डिझेलवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आता पर्यायी इंधन अपरिहार्य असल्याचे मत नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

पेट्रोल-डिझेलवर अवलंबित्व कमी करा, अन्यथा..; नितीन गडकरींचा इशारा
Nitin Gadkari on Petrol-Diesel: पेट्रोल आणि डिझेलवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आता पर्यायी इंधन स्वीकारणे अपरिहार्य असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी कठोर भूमिका घेत युरो 6 सारखे कडक उत्सर्जन (इमिशन) नियम लागू केले जातील, असा इशाराही दिला.
गडकरी म्हणाले, मी वाहतूक मंत्री आहे आणि मी ठाम भूमिका घेतली आहे. डिझेल आणि पेट्रोलवरचे अवलंबित्व कमी करा, नाहीतर युरो-6 चे कडक इमिशन नॉर्म्स लागू करू. ट्रॅक्टर कंपन्यांनी आता फ्लेक्स इंजिन तंत्रज्ञानावर काम सुरू केले असून, 100 टक्के इथेनॉल आणि सीएनजीवर चालणारे फ्लेक्स इंजिन ट्रॅक्टर तयार झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पर्यायी इंधनाला सरकारचे प्रोत्साहन
गडकरी यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकार पर्यायी इंधन आणि बायो-फ्यूल वापरण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देत आहे. त्यांच्या मते, येत्या काळात कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटसाठी वित्तपुरवठा घेताना जर कोणी अल्टरनेटिव्ह फ्यूल किंवा बायो-फ्यूलवर आधारित पर्याय निवडला, तर त्यांना 5 टक्के अनुदान (सब्सिडी) दिली जाईल. यामागचा उद्देश या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर वाढवणे हा आहे.
हायड्रोजनवर चालणारे ट्रक लॉन्च
अलीकडेच तीन नवीन ट्रक लॉन्च करण्यात आले आहेत. यापैकी दोन ट्रक डिझेल/पेट्रोल इंजिनसोबत हायड्रोजन मिश्रण वापरतात. तर एक ट्रक पूर्णपणे हायड्रोजन फ्यूल सेलवर चालतो. याशिवाय, कन्स्ट्रक्शन आणि कृषी उपकरणांमध्येही अशाच प्रकारचे प्रयोग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरींनी ठामपणे नमूद केले की, भारताचे भविष्य पर्यायी इंधन आणि बायो-फ्यूलशी जोडलेले आहे. पर्यावरण संरक्षण, इंधन आयात कमी करणे आणि स्वस्त वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी हाच मार्ग देशाला पुढे नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.