Nirbhaya rape accused have to be hanged on Monday, 16 December | निर्भया प्रकरणी चारही आरोपींना लवकर फासावर लटकवा; आईची मागणी
निर्भया प्रकरणी चारही आरोपींना लवकर फासावर लटकवा; आईची मागणी

नवी दिल्ली : निर्भयावर बलात्कार प्रकरणातील आरोपींना येत्या १६ डिसेंबरला, सोमवारी फासावर लटकवा, अशी मागणी त्या दुर्दैवी बलात्कार पीडितेच्या आईने शुक्रवारी केली. १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री निर्भयावर दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना काही दिवसांनी ती मरण पावली.

निर्भया बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यातील एका आरोपीने आपल्या शिक्षेचा पुनर्विचार व्हावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. त्याच्या मागणीला निर्भयाच्या आईने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत व आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत मी लढा सुरूच ठेवणार आहे, असेही त्यांनी सांगितले. निर्भया प्रकरणातील चार आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबद्दलच्या एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. या आरोपींना लवकरच फाशी दिली जाईल, अशीही चर्चा सध्या सुरू आहे.

...असे घडले प्रकरण

फिजिओथेरपीची विद्यार्थिनी असलेली निर्भया १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री आपल्या मित्रासोबत चित्रपट पाहून परतत होती. दिल्लीच्या मुनिरका येथून द्वारका भागात जाण्यासाठी त्यांनी बस पकडली.प्रवास सुरू झाल्यावर त्या सर्वांनी निर्भयाची छेड काढली. त्यानंतर सहा आरोपींनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला.

बलात्कार प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या निर्भयावर दिल्लीत उपचार सुरू होते; पण प्रकृती खूपच ढासळल्याने तिला सिंगापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिने २९ डिसेंबर २०१२ रोजी अखेरचा श्वास घेतला.

Web Title: Nirbhaya rape accused have to be hanged on Monday, 16 December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.