बंगालमध्ये NIA च्या पथकावर हल्ला, शेकडो ग्रामस्थांच्या जमावाने कारला घातला घेराव, दगडफेक, एक अधिकारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 14:14 IST2024-04-06T14:13:45+5:302024-04-06T14:14:20+5:30
NIA team attacked in West Bengal: केंद्रीय तपास यंत्रणांच्या पथकावर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यात एनआयएचं एक पथक तपासासाठी आलं असताना जमावाने त्यांच्यावर हल्ला केला.

बंगालमध्ये NIA च्या पथकावर हल्ला, शेकडो ग्रामस्थांच्या जमावाने कारला घातला घेराव, दगडफेक, एक अधिकारी जखमी
केंद्रीय तपास यंत्रणांच्या पथकावर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यात एनआयएचं एक पथक तपासासाठी आलं असताना जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात एनआयएचा एक अधिकारी जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी एनआयएचं पथक तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी २०२२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी चौकशी करण्यासाठी आलं होतं.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी झालेल्या त्या बॉम्बस्फोटामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एनआयएने २०२२ च्या डिसेंबर महिन्यामध्ये चौकशीसाठी बलाई मैती आणि मोनोब्रत जाना यांच्यासह टीएमसीच्या काही स्थानिक नेत्यांना समन्स बजावले होते. तसेच आज सकाळी एनआयएच्या पथकाने तिथे पोहोचून संशयितांना ताब्यात घेतले होते.
एनआयएचं पथक संशयितांना घेऊन माघारी परतत असताना ग्रामस्थांच्या जमावाने त्यांचे वाहन अडवले. तसेच त्यांना सोडण्याची मागणी केली. मात्र एनआयएच्या पथकाने त्यास नकार देताच जमाव संतप्त झाला. तसेच या जमावाने एनआयएच्या पथखाच्या वाहनावर हल्ला केला. यात कारच्या काचा फुटून एनआयएचे दोन अधिकारी जखमी झाले. मात्र एनआयएचे पथक जमावाच्या तावडीतून सुटून पोलीस ठाण्यात पोहोचण्यामध्ये यशस्वी झाले.
३ डिसेंबर २०२२ रोजी पूर्व मिदनापूरमधील भूपतीनगर येथे घरात झालेल्या स्फोटात हे घर जमीनदोस्त झाले होते. तसेच स्फोटामध्ये ३ जणांचा मृत्यूही झाला होता. या स्फोटाप्रकरणी तपास करण्यासाठी मागच्या महिन्यात एनआयएने तृणमूल काँग्रेसच्या ३ नेत्यांना समन्स बजावले होते.