पुढची तीन वर्ष कोणतीही निवडणूक लढणार नाही, 9 ते 5 नोकरी करणार - उमा भारती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 11:30 IST2018-02-14T11:30:07+5:302018-02-14T11:30:36+5:30
केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी किमान पुढची तीन वर्ष आपण निवडणूक लढणार नसल्याचं सांगितलं आहे.

पुढची तीन वर्ष कोणतीही निवडणूक लढणार नाही, 9 ते 5 नोकरी करणार - उमा भारती
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी किमान पुढची तीन वर्ष आपण निवडणूक लढणार नसल्याचं सांगितलं आहे. प्रकृती व्यवस्थित नसल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र यावेळी त्यांनी आपण राजकारणातून निवृत्त होत नसल्याचंही स्पष्ट केलं. 'मला गुडघा आणि पाठदुखीचा त्रास होत आहे. त्यासाठी मला आराम करण्याची प्रचंड गरज आहे. पुढील तीन वर्ष मी निवडणूक लढणार नाही', असं त्यांनी म्हटलं आहे. 'आपण राज्यसभेतही जाणार नाही, मात्र पक्षाचा प्रचार करत राहू', असं त्यांनी सांगितलं आहे.
'आपल्याला 9 ते 5 नोकरी करायची आहे', अशी इच्छा उमा भारती यांनी यावेळी व्यक्त केली. 'मला संतुलित आयुष्य जगायचं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे जीवनशैली मला जगायची आहे', असं उमा भारतींनी म्हटलं आहे.
उमा भारती यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'मी तीन दिवसांपुर्वी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याशी फोनवरुन बातचीत केली होती. त्यांनी 2019 पर्यंत मला केंद्रीय मंत्री म्हणून काम करायला सांगितलं आहे'. अशाप्रकारे ब्रेक घेण्यात काही गैर आणि आश्चर्यकारक नाही असं उमा भारतींनी म्हटलं आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनीही प्रकृतीच्या कारणांमुळे आपल्या राजकीय कारकिर्दीदरम्यान ब्रेक घेतला होता असं त्या बोलल्या.
'याचा अर्थ मी राजकारणातून निवृत्ती घेतीये असं नाही', हे उमा भारती यांनी स्पष्ट केलं. 'तीन वर्षानंतरही माझ्यासाठी राजकारणात अनेक वर्ष असतील. प्रकृती अजून बिघडू नये यासाठी मी पुर्णपणे आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष देत आहे', असं उमा भारतींनी सांगितलं.