वॉर्मर मशीनमध्ये बाळाला ठेवून नर्सिंग स्टाफ विसरला, मुलीचा तडफडून मृत्यू; डॉक्टर रुग्णालयातून पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:08 IST2026-02-09T13:06:59+5:302026-02-09T13:08:03+5:30
राजा नर्सिंग होममध्ये अरुण निषाद यांच्या नवजात बाळाचा वॉर्मर मशीनमध्ये जळाल्याने मृत्यू झाला.

फोटो - आजतक
कानपूरच्या बिठूर भागात असलेल्या राजा नर्सिंग होममध्ये अरुण निषाद यांच्या नवजात बाळाचा वॉर्मर मशीनमध्ये जळाल्याने मृत्यू झाला. शालू नावाच्या महिलेने संध्याकाळी ५ च्या सुमारास एका मुलीला जन्म दिला होता. रुग्णालयातील नर्सनी बाळाला थंडीपासून वाचवण्यासाठी आयसीयूतील (ICU) वॉर्मर मशीनवर ठेवलं होतं. मात्र मशीन सुरू केल्यानंतर त्यावर लक्ष ठेवायला नर्सिंग स्टाफ विसरला, ज्यामुळे मशीनचे तापमान प्रचंड वाढलं. या तांत्रिक आणि मानवी निष्काळजीपणामुळे निष्पाप बाळाचं शरीर काळं पडलं आणि तिचा तडफडून मृत्यू झाला.
बाळाच्या जन्मानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण होतं, पण या हलगर्जीपणामुळे आनंदाचे रूपांतर शोकात झालं. नातेवाईकांनी जेव्हा बाळाला पाहण्याचा हट्ट धरला, तेव्हा नर्सनी त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. संशय आल्यावर नातेवाईक जबरदस्तीने आयसीयूमध्ये घुसले, तेव्हा त्यांना दिसलं की चिमुकलीचं डोकं आणि हात वाईट पद्धतीने जळाले होते. या घटनेनंतर रुग्णालयात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती बिघडल्याचं पाहून डॉक्टर विवेक मिश्रा आणि संपूर्ण कर्मचारी रुग्णालय सोडून घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली. डीसीपी एस. एम. कासिम आबिदी यांनी सांगितलं की, बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून रुग्णालयाचं आयसीयू सील करण्यात आलं आहे. आरोग्य विभागालाही यासंदर्भात सूचित करण्यात आलं आहे. नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं. दुसरीकडे रुग्णालय संचालकाने ही घटना म्हणजे केवळ एक 'अपघात' असल्याचं म्हटलं आहे.
हे अरुण यांचं पहिलंच अपत्य होतं, ज्याच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब कोलमडलं आहे. बाळाची आजी प्रेमा आणि इतर नातेवाईक यांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. सर्वात दुःखद बाब म्हणजे बाळाची आई शालू हिला अद्याप तिच्या मुलीच्या मृत्यूची बातमी देण्यात आलेली नाही. या निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्यांना त्वरित अटक करावी आणि रुग्णालयाचा परवाना रद्द करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.