#Bestof2017- या वर्षाची नवी ओळख, वेगवान रस्तेबांधणीचं वर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 13:58 IST2017-12-29T11:00:26+5:302017-12-29T13:58:17+5:30
२०१७ हे वर्ष भारत आणि जगभरात घडलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक घटनांमुळे ओळखले जाईल. मात्र भारतातील एका क्षेत्रामध्ये यंदा उल्लेखनीय प्रगती झाली आहे. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या काळामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत २३% वाढ झाली आहे.

#Bestof2017- या वर्षाची नवी ओळख, वेगवान रस्तेबांधणीचं वर्ष
नवी दिल्ली- २०१७ हे वर्ष भारत आणि जगभरात घडलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक घटनांमुळे ओळखले जाईल. मात्र भारतातील एका क्षेत्रामध्ये यंदा उल्लेखनीय प्रगती झाली आहे. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या काळामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत २३% वाढ झाली आहे.
महामार्ग आणि गावांना जोडणार्या रस्त्यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्व असते. केंद्र सरकारने यामुळेच महामार्ग बांधण्यावर विशेष लक्ष देण्याचे धोरण अवलंबले आहे. या आर्थिक वर्षात ९००० किमी महामार्ग बांधले जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मागील आर्थिक वर्षात ८२३१ किमीचे महामार्ग बांधण्यात आले होते. भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुरवलेल्या आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरीपर्यंत प्रतिदिन २० किमी अशा सरासरीने ४९४२ किमीचे महामार्ग बांधले गेले तर मागच्या वर्षी याच कालावधीत प्रतिदिन १६.७ किमी गतीने ४०१७ किमी लांबीचे महामार्ग बांधून पूर्ण झाले होते . केंद्र सरकारने 83 हजार किमी लांबीचे महामार्ग बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. त्यासाठी सध्य़ा असलेल्या रस्ते बांधणीच्या गतीमध्ये दुपटीने वाढ करावी लागणार आहे. या महामार्ग बांधणीमुळे रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.
भारतमाला प्रकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार ?
भारतमाला योजनेअंतर्गत देशात ४४ आर्थिक कॉरिडोर उभारण्यात येणार असून त्यातील १२ कॉरिडोर महाराष्ट्रातून जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांतून हे आर्थिक कॉरिडॉर जातील.
ते म्हणाले की, ४४ आर्थिक कॉरिडोरपैकी १२ आर्थिक कॉरिडोर महाराष्ट्रातून जाणार आहेत. त्यात मुंबई-कोलकाता (१,८५४ किमी), मुंबई-कन्याकुमारी (१,६१९किमी), आग्रा-मुंबई (९६४), पुणे-विजयवाडा (९0६ किमी), सुरत-नागपूर (५९३ किमी), सोलापूर-नागपूर (५६३ किमी), इंदूर-नागपूर (४६४ किमी), सोलापूर-बेल्लारी-गुट्टी (४३४ किमी), हैदराबाद-औरंगाबाद (४२७ किमी), नागपूर-मंडी दाबवली (३८७ किमी), सोलापूर-मेहबुबनगर (२९0 किमी) आणि पुणे-औरंगाबाद (२२२ किमी) यांचा समावेश असेल.
या सर्व आर्थिक कॉरिडोरची मिळून लांबी ८,५0१ किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रातून जाणाºया या आर्थिक कॉरिडोरमुळे ८ राज्यांशी महाराष्ट्र जोडला जाईल. या १२ आर्थिक कॉरिडोरमध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, जालना, नागपूर, रत्नागिरी, धुळे, पुणे, सोलापूर, जळगाव, लातूर, नांदेड, यवतमाळ व वर्धा या १६ जिल्ह्यांचा समावेश आहे. वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी देशातील २८ शहरांमध्ये रिंग रोडचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यात राज्यातील पुणे, नागपूर, धुळे या शहरांचा समावेश आहे. देशात २४ मालवाहतूक तळ उभारण्यात येणार असून, त्यात महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, जेएनपीटी, मुंबई पोर्ट, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, नाशिक या ९ ठिकाणांचा समावेश करण्यात आल्याचेही गडकरी यांनी सांगितले.