बॉम्बची खोटी माहिती दिल्यास १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड, विमान कंपन्यांना मिळणाऱ्या धमक्यांनंतर केंद्राचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:53 IST2024-12-18T13:49:47+5:302024-12-18T13:53:21+5:30
New Aviation Rules: या धमक्यांमुळे विमान कंपन्यांचे आर्थिक नुकसान झाले. सोबतच प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

बॉम्बची खोटी माहिती दिल्यास १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड, विमान कंपन्यांना मिळणाऱ्या धमक्यांनंतर केंद्राचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे. त्यानुसार, ९ डिसेंबरनंतर कोणत्याही विमान कंपनीत बॉम्बची खोटी माहिती देणाऱ्याला १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
२०२४ या एका वर्षात १ हजाराहून अधिक वेळा खोट्या धमक्या दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या धमक्यांमुळे विमान कंपन्यांचे आर्थिक नुकसान झाले. सोबतच प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. या सर्व बाबी लक्षात घेऊन सरकारने मोठा दंड आकारण्याची तयारी केली आहे.
बॉम्बच्या खोट्या धमक्या दिल्याप्रकरणी दोषी आढळल्यास, अनेक गंभीर गुन्हेगारी आरोपांसह १ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच, अशा कारवायांमध्ये सहभागी असलेल्या संघटनांवर शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. छोट्या संघटनांना ५० लाख रुपये, मध्यम संघटनांना ७५ लाख रुपये, तर मोठ्या संघटनांना १ कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
केंद्र सरकारने सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी ब्युरोला अधिकार दिले आहेत की, सुरक्षेचे धोके लक्षात घेऊन ते कोणत्याही प्रवाशाला विमानात प्रवेश करण्यापासून रोखू शकतात. यासोबतच, एखादा प्रवासी चुकीची माहिती देऊन विमानात बसलेल्या लोकांना समस्या निर्माण करतो आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करतो किंवा पायलटला त्रास देतो. अशा स्थितीत त्या प्रवाशावर कारवाई होऊ शकते.
सरकारकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण ९९४ घटनांची नोंद झाली आहे. तर ऑगस्ट २०२२ पासून आतापर्यंत धमक्यांचे एकूण ११४३ गुन्हे दाखल झाले आहेत. आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. ही आकडेवारी वाढण्यामागचे कारण म्हणजे सोशल मीडियावरून दिला जाणाऱ्या धमक्या आहेत. ज्या नंतर डिलिट केल्या जातात.