"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:14 IST2025-12-08T18:13:48+5:302025-12-08T18:14:58+5:30
"पंडित जवाहरलाल नेहरू हे देशासाठी जगले आणि देशासाठीच मरण पावले. जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान आहेत, जवळपास तेवढेच दिवस नेहरू जेलमध्ये राहिले..."

"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज संसदेत, ज्या गीताने पारतंत्र्याच्या काळात देशातील जनतेच्या मनात स्वातंत्र्याची धगधगती आग प्रज्वलित ठेवली, अशा बंकिमचंद्र चटोपाध्याय (बंकिमचंद्र चटर्जी) यांनी रचलेल्या 'वंदे मातरम्' या गीतावर चर्चा पार पडली. या चर्चेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही भाग घेतला. दरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर थेट निशाणा साधला. यावेळी त्यांनी पंडित नेहरू यांच्या योगदानासंदर्भात भाष्य केले.
काय म्हणाल्या प्रियांका गांधी? -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना प्रियांका म्हणाल्या, "पंडित जवाहरलाल नेहरू हे देशासाठी जगले आणि देशासाठीच मरण पावले. जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान आहेत, जवळपास तेवढेच दिवस नेहरू जेलमध्ये राहिले."
नेहरुंनी इस्रोची निर्मिती केली नसती, तर... -
पंडित नेहरूंच्या योगदानासंदर्भात बोलताना, "जर नेहरुंनी इस्रोची निर्मिती केली नसती, तर आज तुम्ही चंद्र मोहिमा केल्या असत्या का? असा प्रश्न प्रियांका यांनी उपस्थित केला. तसेच, सरकारने एकदा नेहरुंवरही चर्चा करायला हवी, असे आव्हानही त्यांनी दिले. वंदे मातरमवरील चर्चेच्या माध्यमातून देशाचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून दूर नेले जात आहे. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे, प्रदूषण आदी गंभीर मुद्द्यांवर चर्चा न करता सरकार छोटीशी चर्चा करून जनतेची दिशाभूल करत आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
LIVE: संसद में वंदे मातरम पर चर्चा https://t.co/RQOWZLTrdA
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 8, 2025
या चर्चेमागे दोन कारणे...?
सरकारवर टीका करत प्रियांका म्हणाल्या, या चर्चेमागे दोन कारणे आहेत. पहिले- पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुका आणि दुसरे म्हणजे इतिहासात ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्यावर नवे आरोप लादण्याचा प्रयत्न. तसेच, हे सरकार भविष्याकडे पाहत नाही. खऱ्या समस्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करणे हाच त्यांचा उद्देश असतो, असेही प्रियांका म्हणाल्या.