बॅड लोन्सच्या मुक्तीसाठी साडेसहा लाख कोटी गरज
By Admin | Updated: March 31, 2017 00:36 IST2017-03-31T00:36:17+5:302017-03-31T00:36:17+5:30
भारतीय बँकांचे १४ लाख कोटी रुपये तणावपूर्ण मालमत्तेच्या (विविध कारणांनी थकलेली कर्जे) स्वरूपात अडकून पडले

बॅड लोन्सच्या मुक्तीसाठी साडेसहा लाख कोटी गरज
नवी दिल्ली : भारतीय बँकांचे १४ लाख कोटी रुपये तणावपूर्ण मालमत्तेच्या (विविध कारणांनी थकलेली कर्जे) स्वरूपात अडकून पडले असून या बॅड लोन्समधून मुक्त होण्यासाठी बँकांना किमान ६,५0,000 कोटी रुपयांची गरज आहे, असे प्रतिपादन कोटक महिंद्रा बँकेचे कार्यकारी व्हाइस चेअरमन तथा कार्यकारी संचालक उदय कोटक यांनी केले आहे.
उदय कोटक यांनी सांगितले की, आमच्या अंतर्गत संशोधनानुसार, भारतीय बँकांतील एकूण तणावपूर्ण मालमत्ता १४ लाख कोटींची आहे. त्यात अनुत्पादक मालमत्ता (एनपीए), पुनर्रचित मालमत्ता, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या, धोरणात्मक कर्ज पुनर्रचना (एसडीआर), ५:२५ योजना आणि औद्योगिक कर्ज पुनर्रचना (सीडीआर) यांचा समावेश आहे. यातील ३0 टक्के मालमत्ता बुडीत गृहीत धराव्या लागतील. याचाच अर्थ ४ लाख कोटी रुपयांची नेट तूट बँकांना भरून काढावी लागेल.
ही ४ लाख कोटी रुपयाची रक्कम बँकिंग व्यवस्थेतील एकूण भांडवलाच्या अर्धी आहे. उरलेल्या १0 लाख कोटींच्या भांडवलाचा मुद्दा सोडविण्यासाठी आणखी २.५ लाख कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. अशा प्रकारे या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी बँकांना साडेसहा लाख कोटी रुपयांची गरज लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बॅड बँकांची गरज
तणावपूर्ण १४ लाख कोटी रुपयांपैकी १0 लाख कोटी रुपये बॅड बँकेकडे हस्तांतरित करता येऊ शकतात. त्यासाठी आपल्याला दोन ते तीन मोठ्या बॅड बँकां स्थापन करण्याची गरज आहे, असे मला वाटते.
बॅड बँकांच्या स्थापनेवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. बॅड बँका सामान्य बँकांची तणावपूर्ण कर्जे विकत घेतील. तसेच त्यांच्या वसुलीची प्रक्रिया राबवतील. चांगल्या प्रकारे भांडवल असलेल्या बॅड बँका असायला हव्यात. त्यातील मोठा हिस्सा खासगी क्षेत्रातून आलेला असावा.