"बिहारमध्ये एनडीए १६० हून अधिक जागा जिंकेल"; मतदानाच्या पहिल्या टप्प्यापूर्वी अमित शाह यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 20:46 IST2025-11-04T20:25:20+5:302025-11-04T20:46:22+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शाह निकालाबाबत भाष्य केले आहे.

"बिहारमध्ये एनडीए १६० हून अधिक जागा जिंकेल"; मतदानाच्या पहिल्या टप्प्यापूर्वी अमित शाह यांचा मोठा दावा
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठा दावा केला. १४ नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होतील तेव्हा एनडीए १६० हून अधिक जागा जिंकेल. या निवडणुकीत युतीतील सर्व पक्षांचा स्ट्राइक रेट चांगला असेल, असा दावा शाह यांनी केला.
बिहार निवडणूक प्रचारासाठी अमित शहा यांनी महाआघाडीवर निशाणा साधला. लालू यादव यांचा फोटो त्यांच्या पोस्टरमधून वगळला होता. त्यांनी महाआघाडीला लालू यादव यांना का वगळण्यात आले आहे याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले. आमच्या पोस्टरवर असे अनेक लोक दिसतात जे निवडणूक लढवत नाहीत, तरीही आम्ही त्यांचा समावेश करतो, असंही शाह म्हणाले.
बिहार निवडणुकीत मुस्लिम उमेदवार उभे न करण्याच्या प्रश्नावर अमित शहा म्हणाले की, एनडीए चार मुस्लिम उमेदवार उभे करत आहे. आम्ही फक्त विजयी उमेदवारांनाच तिकीट देतो.
राहुल गांधींवर निशाणा
यावेळी अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या पंतप्रधान मोदी मतांसाठी नाचू शकतात या विधानावर बोलताना शाह म्हणाले की, या विधानांचा फटका काँग्रेसला सहन करावा लागेल. मणिशंकर अय्यर ते सोनिया गांधी यांच्यापर्यंत जेव्हा जेव्हा पंतप्रधान मोदींविरुद्ध अपशब्द वापरले गेले तेव्हा भाजपचा विजय अधिक मजबूत झाला. यावेळी काँग्रेस नेत्यांनी छठ मैय्याचाही अपमान केला. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असंही शाह म्हणाले.