काँग्रेसला सत्तेची भूक नाही..; पंतप्रधानपदाबाबत मल्लिकार्जुन खर्गेंचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 13:47 IST2023-07-18T13:34:41+5:302023-07-18T13:47:10+5:30
NDA Vs Opposition Meeting: आजचा दिवस राष्ट्रीय राजकारणासाठी महत्वाचा आहे. एकीकडे राजधानी दिल्लीत NDA, तर दुसरीकडे बंगळुरुत UPA ची महाबैठक सुरू आहे.

काँग्रेसला सत्तेची भूक नाही..; पंतप्रधानपदाबाबत मल्लिकार्जुन खर्गेंचे मोठे वक्तव्य
LokSabha Election: 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी एक वर्षाहून कमी कालावधी उरला आहे. यामुळेच सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापली तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपला हटवण्यासाठी काँग्रेस विरोधी पक्षांची मूठ बांधत आहे. याच पार्श्वभूमीवर आज बंगळुरुत विरोधकांची मोठी बैठक होत आहे. या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
आजचा दिवस राष्ट्रीय राकारणासाठी फार महत्वाचा आहे. एकीकडे राजधानी दिल्लीत NDA ची बैठक होत आहे, तर दुसरीकडे बंगळुरुत UPA ची बैठक सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कोणापासून लपलेली नाही. अशा परिस्थितीत मोदींसमोर विरोधकांचा चेहरा कोण असेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यातच आता विरोधकांच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत काँग्रेस पक्ष नसेल, असा दावा खर्गेंनी केला आहे.
#WATCH कर्नाटक: बेंगलुरु में विपक्षी दलों की बैठक शुरू हुई। pic.twitter.com/OIdUjmlAjo
— ANI_HindiNews (@AHindinews) July 18, 2023
विशेष म्हणजे, काँग्रेसकडून नेहमीच राहुल गांधी यांनाच पंतप्रधानपदासाठी प्रोजेक्ट केले गेले आहे. पण, आता खर्गे यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, बंगळुरुरीतील बैठकीत भाजपचा पराभव करण्यासाठी रणनीती आखण्यासह विविद मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. बैठकीनंतर सायंकाळी विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद होईल, यात बैठकीतील नेमकी माहिती समोर येईल.
आजच्या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव, PDP प्रमुख महबूबा मुफ्ती, राजद प्रमुख लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, NCP प्रमख शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आप प्रमुख अरविंद केजरीवाल, डीएमकेचे स्टॅलिन यांच्यासह 24 पक्षाचे प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.