'त्या' ४१ जागांवर एनडीए, महाआघाडीचे आहे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:47 IST2025-10-29T12:46:55+5:302025-10-29T12:47:19+5:30
याच जागा ठरवतील बिहारच्या सत्तेचे भवितव्य

'त्या' ४१ जागांवर एनडीए, महाआघाडीचे आहे लक्ष
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत उद्या बुधवारपासून प्रचार वेग घेणार आहे. यादरम्यान काँग्रेस-व भाजपप्रणित एनडीए या दोन्ही आघाड्यांचे २०२० मध्ये ३ हजारहून कमी मतांच्या फरकाने निवडून आलेल्या ४१ जागांवर लक्ष असून या जागा जिंकण्यासाठी शक्ती लावली आहे.
गेल्या निवडणुकीत कमी फरकाने निवडून आलेल्या या उमेदवारांच्या बळावरच एनडीएचे सरकार आले होते. आता याच जागा यंदा सत्तेचा आधार ठरणार आहेत. या ४१ जागांपैकी ११ जागांवर विजयी मतांचा फरक १,००० पेक्षा कमी होता.
यात एनडीएने ७ तर महाआघाडीला ४ जागा मिळाल्या होत्या. याच प्रकारे ३० जागांवर विजयाचे अंतर १००० ते ३००० दरम्यान होते. यात एनडीएने १९ जागा जिंकल्या होत्या. महाआघाडीला फक्त ९ आणि इतर पक्षांना २ जागा मिळाल्या होत्या.
बहुतांश जागांवर १२ हजारांचा फरक
२०२० मध्ये एनडीए व महाआघाडीच्या उमेदवारांतील मतांचा फरक सरासरी १२ हजार मतांचा होता. या अटीतटीच्या लढाईत राजद ७५ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणूनही उदयास आला. परंतु, सत्तेचे गणित जुळवण्यात त्यांना एकूण संख्याबळ कमी पडले.
१६० जागा जिंकण्याचे एनडीएचे लक्ष्य
एनडीएच्या सूत्रांनुसार, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने ३० जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे विधानसभेत किमान १६० जागा जिंकण्यावर एनडीएने लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या हिशेबाने महाआघाडीला ६२ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती.