'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:25 IST2025-11-21T13:23:50+5:302025-11-21T13:25:40+5:30
नितीश कुमार स्वतः प्रामाणिक आहेत, पण त्यांच्या नावाने भ्रष्टाचाराचा खेळ खेळला जात आहे. एनडीए मते खरेदी करून प्रचंड विजयाचा दावा करत आहे, असंही प्रशांत किशोर म्हणाले.

'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयावर आणि जन सुराजच्या पराभवावर प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया दिला. 'जनतेची मते विकत घेण्यात आली. निवडणुकीदरम्यान महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये पाठवण्यात आले आणि जीविका दिदींना त्यांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले. नितीश कुमार स्वतः प्रामाणिक आहेत, परंतु त्यांच्या नावाने भ्रष्टाचार केला जात आहे. मतांसाठी जागतिक बँकेचे कर्जाचे पैसे वळवून सार्वजनिक खात्यात पाठवण्यात आले. ज्या गरीब लोकांची मुलांची स्वप्ने हिरावून घेण्यात आली त्यांच्यावरील हा अन्याय आहे. जन सुराजला थांबवता येणार नाही, अशी प्रतिक्रिया प्रशांत किशोर यांनी दिली.
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
प्रशांत किशोर गुरुवारी चंपारणमधील भितिहरवा येथील गांधी आश्रमात गेले होते. तिथे त्यांनी विधानसभा निवडणुकीत जन सुराजच्या पराभवानंतर मौन केले. दरम्यान, आज शुक्रवारी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. गेल्या सहा ते सात दिवस खूप कठीण होते. कारण जन सुराजचा पराभव नव्हता, तर बिहारमधील लोकांची मते दररोज साडेपाच रुपये दराने खरेदी केली जात होती ही धारणा होती. हा लोकशाहीवरील अन्याय आहे, असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला.
'जन सुराज विचारसरणीशी संबंधित लोकांसाठी हे गांधी आश्रम प्रेरणास्थान आहे. "येथून, आम्ही आमची वाटचाल सुरू केली आणि जन सुराज लाखो लोकांचे कुटुंब बनले," असे ते म्हणाले. बिहारमध्ये बरेच काही बदलू शकेल अशी आशा निर्माण झाली. पण लोकशाहीचा पाया, मत, विकत घेतले गेले. देशाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात अशी ही पहिलीच घटना आहे, असा दावा त्यांनी केला.
भारत हा अशा काही मोजक्या देशांपैकी एक आहे तिथे सुरुवातीपासूनच सर्वांना मतदानाचा अधिकार आहे. निवडणुकीपूर्वी सरकारने एक योजना सुरू केली त्या अंतर्गत दहा हजार रुपये देण्यात आले. पैसे मिळाल्यानंतर कोणीही आपले मत बदलू नये यासाठी सरकारी यंत्रणा उभारण्यात आल्या. त्यांनी दुसऱ्याला मतदान करू नये यासाठी कडक देखरेख ठेवण्यात आली. यामुळे लक्षणीय बहुमत मिळाले. बिहार निवडणुकीच्या निकालाचा परिणाम संपूर्ण देशावर होईल. जर हे मान्य केले तर सत्तेत असलेला पक्ष कधीही निवडणूक हरणार नाही, असे विधान प्रशांत किशोर यांनी केले.