गोव्यात तृणमूलला नाकारून राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; मणिपूरमध्ये काँग्रेससोबत आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 09:15 IST2022-01-13T09:15:14+5:302022-01-13T09:15:31+5:30
तथापि, मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत व जागावाटप करणार आहेत.

गोव्यात तृणमूलला नाकारून राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; मणिपूरमध्ये काँग्रेससोबत आघाडी
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसला दुखावणारी कोणतीही कृती करणार नाही आणि गोव्यात तृणमूल काँग्रेससोबत जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीला ५-६ जागा देण्यास काँग्रेस तयार नसली, तरी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष तृणमूलसोबत जाणार नाही. पीसीपीचे ठाम मत आहे की, गोव्यात तृणमूलचे समर्थक नाहीत आणि ते केवळ चाचपणी करीत आहेत.
तथापि, मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत व जागावाटप करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस या पर्वतीय राज्यात सहाच्या आसपास जागा लढवू शकते. उत्तर प्रदेशमध्येदेखील राष्ट्रवादीला समाजवादी पक्षाने सामावून घेतले आहे. तेथे पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीला एक जागा दिली आहे. तेथे १० फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याने उमेदवार निश्चित केले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील घडामोडींशी संबंधित असलेल्यांचे म्हणणे आहे की, या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत केलेल्या विधानाच्या विरुद्ध आहेत. तेथे त्यांनी काँग्रेस-तृणमूल काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात त्रिपक्षीय आघाडीचे जोरदार समर्थन केले होते. ममता बॅनर्जींनी गोवा आणि इतर राज्यांमध्ये जे काही केले ते भाजपविरोधी शक्तीना कमकुवत करण्यासाठी आहे, हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना समजावून सांगताना काँग्रेस नेतृत्वाला वेदना होत होत्या. त्यामुळे टीएमसीशी कोणताही समझोता होऊ शकत नाही, या ठोस संदेशानंतरच राष्ट्रवादीने तृणमूलपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तथापि, पक्ष तेथे अनेक जागा स्वबळावर लढविणार आहे, कारण तेथे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. मणिपूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याने महाराष्ट्रातही संबंधांत कडवटपणा येणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.