सुप्रिया सुळेंनी भर लोकसभेत केले अमित शाह यांचे कौतुक; ठाकरे गटाचेही समर्थन, नेमके काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:16 IST2025-04-03T14:13:31+5:302025-04-03T14:16:13+5:30
Manipur President Rule Issue In Lok Sabha: मणिपूरच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गटाने लोकसभेत पाठिंबा दिला.

सुप्रिया सुळेंनी भर लोकसभेत केले अमित शाह यांचे कौतुक; ठाकरे गटाचेही समर्थन, नेमके काय घडले?
Manipur President Rule Issue In Lok Sabha: बुधवारचा दिवस वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून चांगलाच गाजला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी केवळ यावर राजकीय मते व्यक्त केली नाही, तर सुधारणा विधेयकावर लोकसभेत विस्तृत चर्चा झाली. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आपापले म्हणणे मांडले. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत दीर्घ चर्चेनंतर मध्यरात्री मतदानाने पारित करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ एवढी मते पडली. एनडीएतील जेडीयू, टीडीपी, शिंदेसेना यांचे विधेयकाला समर्थन आहे. यानंतर मध्यरात्री २ वाजता मणिपूरबाबत एक प्रस्ताव लोकसभेत सादर करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यरात्री २ वाजता मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीला अनुमोदन देण्याचा प्रस्ताव ठेवला. मध्यरात्री राष्ट्रपती राजवटीबाबत लोकसभेत चर्चा झाली. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यावर लोकसभेत एकमत झाले. राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही पाठिंबा दिला. या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्तुती करताना आपले म्हणणे लोकसभेत मांडले.
सुप्रिया सुळेंनी भर लोकसभेत केले अमित शाह यांचे कौतुक
अमित शाह यांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, आम्हाला गृहमंत्र्यांकडून जास्त अपेक्षा आहेत. अमित शाह हे खंबीर गृहमंत्री आहे. अमित शाह यांच्यामुळे काश्मीरमध्ये खूप चांगले परिणाम पाहायला मिळत आहेत. असे असले तरी आमचे मणिपूरवर समाधान नाही. हे सरकार, एक देश एक निवडणुकीवर चर्चा करत आहे. पण राष्ट्रपती राजवट लावावी लागते, हे सशक्त लोकशाहीसाठी चांगले नाही. अमित शाह खंबीर आहेत, त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे की, मणिपूरमध्ये आपण शांतता प्रस्थापित कराल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच पंतप्रधान मोदी कधी तिथे गेले नाहीत. आम्ही मणिपूरला गेलो, तेव्हा गोगोई आमच्या सोबत होते. तेव्हा महिला राज्यपालांनी हतबलता प्रकट केली होती. परंतु, आम्ही राष्ट्रपती राजवटीचे समर्थन करतो, असे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
अमित शाह मणिपूरबाबत लोकसभेत काय म्हणाले?
न्यायालयाच्या निर्णयानंतर जातीय हिंसा भडकली. या दंगली नाहीत किंवा हा दहशतवाद नाही. उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा अर्थ लावण्यावरून दोन समुदायामध्ये जातीय हिंसाचार झाला. सर्वांनी यावर चिंता व्यक्त केली. मणिपूर येथे गेल्या चार महिन्यांपासून हिंसाचार झालेला नाही. मणिपूरमधील परिस्थिती समाधानकारक आहे, असे मी म्हणणार नाही; पण, ती नियंत्रणात आहे. काँग्रेसकडे इतके खासदार नाहीत की, ते अविश्वास प्रस्ताव मांडतील. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार सर्व शक्य पावले उचलत आहे, असे अमित शाह यांनी नमूद केले.
याला पक्षाशी जोडू नका, हिंसाचार व्हायला नको
मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात २६० लोकांचा मृत्यू झाला. औषधे आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जातीय हिंसा होते, तेव्हा हे प्रश्न उपस्थित होतात. याला पक्षाशी जोडू नका. मणिपूरमध्ये १९९३ साली कुकी-नागा यांच्यात जातीय संघर्ष झाला. हा संघर्ष पाच वर्षे सुरू राहिला. पुढे एक दशक छोट्या मोठ्या घटना सुरू होत्या. तुमच्या काळात जास्त झाले, आमच्या काळात कमी झाले, पण हिंसाचार व्हायला नको, असे अमित शाह यांनी स्पष्टपणे सांगितले.