शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष, राहुल विरोधी पक्षनेते?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 03:20 AM2019-06-01T03:20:51+5:302019-06-01T10:27:12+5:30

लोकसभेत राहुल गांधी व बाहेर पक्षाध्यक्ष शरद पवार याप्रकारे काँग्रेस अधिक मजबुतीने काम करेल, असे दोन्ही पक्षांना वाटत आहे

NCP and Congress merges loud | शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष, राहुल विरोधी पक्षनेते?

शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष, राहुल विरोधी पक्षनेते?

Next

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाही म्हणत असले, तरी काँग्रेसमध्ये तो पक्ष विलीन होण्याची शक्यता आहे. उच्चपदस्थांच्या माहितीनुसार दोन्ही पक्षांत चर्चा सुरू आहे. मात्र, विलीनीकरणानंतर राज्य नेतृत्वाबाबत काय करायचे, हे स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले की, विलीनीकरण होणार, हे जवळपास नक्की आहे. मात्र, त्यासाठी किती कालावधी लागेल, हे आताच सांगणे शक्य नाही. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, राहुल गांधीशरद पवार यांच्या गुरुवारच्या भेटीत याबाबत चर्चा झाली नाही, कारण दोघांत हा विषय आधीच चर्चिला गेला  आहे. या दोघा नेत्यांच्या विचारांत कमालीचे साधर्म्य असून, लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहता, दोन्ही पक्षांना विलिनीकरणाबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

राहुल गांधी पक्षाध्यक्षपद सोडण्याबाबत अतिशय आग्रही असून, त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर ते पद शरद पवार यांना मिळू शकेल, याची जोरात चर्चा सुरू आहे. मात्र राहुल गांधी अंतिम निर्णय घेईपर्यंत असे अंदाज बांधणे चुकीचे ठरेल, असे काँग्रेस नेत्याने स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्षपदाबाबत किमान एक महिना लागेल, असे सांगून हा नेता म्हणाला की, पद सोडल्यानंतरही ते पद कोणाला द्यायचे, याचा निर्णयही राहुल गांधी स्वत:च घेतील. तोपर्यंत सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल.

काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे विलिनीकरण झाल्यास लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्नही सुटू शकेल. काँग्रेसकडे ५२, तर राष्ट्रवादीकडे ५ खासदार आहे. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी ५४ खासदारांचीच गरज आहे. कदाचित पक्षाध्यक्षपद सोडल्यावर राहुल गांधीच विरोधी पक्षनेते होऊ शकतील.  लोकसभेत राहुल गांधी व बाहेर पक्षाध्यक्ष शरद पवार याप्रकारे काँग्रेस अधिक मजबुतीने काम करेल, असे दोन्ही पक्षांना वाटत आहे.

Web Title: NCP and Congress merges loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.