नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक, ओडिशामधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:08 IST2025-05-28T14:08:58+5:302025-05-28T15:08:03+5:30
Naxalites: ओडिशा येथील राऊरकेला येथून स्फोटकांनी भरलेला ट्रक लुटला आहे. या ट्रकमध्ये तब्बल दीड हजार किलो स्फोटकं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक, ओडिशामधील धक्कादायक घटना
गेल्या काही काळापासून सुरक्षा दलांनी जोरदार कारवाया करत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. असं असलं तरी नक्षलवादाचा पुरता बीमोड झालेला नाही. तसेच त्यांचं आव्हान सुरक्षा दल आणि सरकारसमोर कायम आहे. अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, ओडिशा येथील राऊरकेला येथून स्फोटकांनी भरलेला ट्रक लुटला आहे. या ट्रकमध्ये तब्बल दीड हजार किलो स्फोटकं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर झारखंड आणि ओडिशामध्ये पोलीस सतर्क झाले आहेत.
नक्षलवाद्यांनी लुटलेला ट्रक हा राऊरकेला येथील केबलांग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बांको दगड खाणीकडे जात होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी ट्रक अडवून त्यामधील चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर ट्रक जबरदस्तीने सागंडा येथीलल घनदाट जंगलांच्या दिशेने नेला.
गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात घडक कारवाई सुरू केली आहे. त्यात अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत. तर अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे. मात्र तरीही महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा राज्याच्या काही भागात नक्षलवाद्यांचं आव्हान कायम आहे.