"हनुमान चालीसा म्हटल्यास जीवे मारू", नवनीत राणांना धमकीचा फोन, पोलिसांत तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 06:28 PM2022-05-25T18:28:53+5:302022-05-25T18:40:31+5:30

Navneet Rana : नवनीत राणा यांनी याबाबात नवी दिल्लीतील नॉर्थ अवेन्यू पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

Navneet Rana receives threatening phone call for Hanuman Chalisa | "हनुमान चालीसा म्हटल्यास जीवे मारू", नवनीत राणांना धमकीचा फोन, पोलिसांत तक्रार

"हनुमान चालीसा म्हटल्यास जीवे मारू", नवनीत राणांना धमकीचा फोन, पोलिसांत तक्रार

Next

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून विविध वादांमुळे चर्चेत असलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हटल्यास तुम्हाला जीवे मारू अशी धमकी दिल्याची तक्रार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी याबाबात नवी दिल्लीतील नॉर्थ अवेन्यू पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

स्वतःला धर्मगुरू म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीने फोन करून महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणून दाखवा, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे खासदार नवनीत राणा यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. दरम्यान, याप्रकरणी नवनीत राणा यांनी नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.  त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांनी सुरू केला आहे. 

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नवनीत राणा यांच्या फोनवर जवळपास अकरा वेळा फोन करण्यात आला होता. सार्वजनिकपणे हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केल्यास जीवे मारु, अशी धमकी देण्यात आले आहे. तसेच, नवनीत राणा यांनी त्या व्यक्तीने फोनवरुन शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा मुद्दा लावून धरला होता. याच मुद्द्यावरून त्यांना जेलवारीही करावी लागली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांना धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी  नवनीत राणा  यांच्यावर अ‍ॅसिड फेकण्याची एका अज्ञाताने धमकी दिली असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता. 

हनुमान चालीसावरून राणा दाम्पत्याची जेलवारी
खासदार नवनीत राणा  आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर मुंबईत मोठा गदारोळ झाला होता. यामुळे राणा दाम्पत्याला जेलवारी सुद्धा करावी लागली. गेल्या काही दिवासांपूर्वीच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीच्या बाहेरच हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरला होता. त्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाल्याचे दिसून आले. हा वाद एवढा वाढला की नवनीत राणा आणि रवी राणा यांना जेलमध्ये जावे लागले होते. यातच आता पुन्हा हनुमान चालीसा पठणावरूनच नवनीत राणा यांना धमकी आल्याने पुन्हा एकदा राजकारणात खळबळ माजली आहे. 
 

Web Title: Navneet Rana receives threatening phone call for Hanuman Chalisa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.