Road Rage Case: नवज्योतसिंग सिद्धूंना कोर्टाचा मोठा दिलासा, 'त्या' प्रकरणाची सुनावणी ढकलली पुढे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 16:46 IST2022-02-03T16:45:38+5:302022-02-03T16:46:15+5:30
Punjab Assembly Election 2022: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिंधू यांना 34 वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

Road Rage Case: नवज्योतसिंग सिद्धूंना कोर्टाचा मोठा दिलासा, 'त्या' प्रकरणाची सुनावणी ढकलली पुढे
मोहाली: आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिंधू यांना 34 वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 25 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे. 27 डिसेंबर 1988 रोजी सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदर सिंग संधू यांचा पटियालामध्ये कार पार्किंगवरून गुरनाम सिंग नावाच्या एका वृद्ध व्यक्तीशी वाद झाला होता. त्या भांडणात गुरनामचा मृत्यू झाला. सिद्धू आणि रुपिंदर सिंग संधूविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पंजाब सरकार आणि पीडित कुटुंबाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1999 मध्ये सत्र न्यायालयाकडून सिद्धूला दिलासा मिळाला आणि खटला फेटाळण्यात आला. आरोपींविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत आणि अशा परिस्थितीत केवळ संशयाच्या आधारे खटला सुरू करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. पण 2002 मध्ये राज्य सरकारने सिद्धूंविरोधात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात अपील केले. 1 डिसेंबर 2006 रोजी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सिद्धू आणि त्यांच्या मित्राला दोषी ठरवले.
सिद्धू आणि संधू यांना 3 वर्षांची शिक्षा
6 डिसेंबर रोजी सुनावण्यात आलेल्या निकालात सिद्धू आणि संधूला तीन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. 10 जानेवारी 2007 पर्यंत सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. दोन्ही आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात अपील केली आणि 11 जानेवारी रोजी चंदीगड न्यायालयात आत्मसमर्पण केले. 12 जानेवारीला सिद्धू आणि त्यांच्या मित्राला सुप्रीम कोर्टातून जामीन मिळाला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्याचबरोबर तक्रारदारांनी सुप्रीम कोर्टातही पोहोचून सिद्धूला हत्येप्रकरणी दोषी ठरवण्याची मागणी केली.