अखेर नवज्योतसिंग सिद्धूंनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 12:59 IST2019-07-15T12:58:34+5:302019-07-15T12:59:03+5:30

याआधी नवज्योतसिंग सिद्धू यांनी 10 जूनला तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा पाठविला होता.

Navjot Singh Sidhu: Today I have sent my resignation to Punjab Chief Minister. | अखेर नवज्योतसिंग सिद्धूंनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला राजीनामा

अखेर नवज्योतसिंग सिद्धूंनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला राजीनामा

चंदीगड : पंजाब सरकारमधील काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याकडे पाठविला आहे. याआधी नवज्योतसिंग सिद्धू यांनी 10 जूनला तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा पाठविला होता. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यामुळे पंजाबमधील राजकीय वर्तुळात कालपासून खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयात मंत्रीपदाचा राजीनामा आला नसल्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे मीडिया सल्लागार रवीन ठुकराल यांनी सांगितल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्विट केले होते. यामध्ये मुख्यमंत्र्यांना राजीनामा पाठविण्यात येईल, असे म्हटले होते. त्यानुसार, आज नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा पाठविला आहे.


याआधी नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे पाठविल्याचे सांगितले होते. याबाबतची माहिती नवज्योतसिंग सिद्धू यांनी काल ट्विटरवरुन दिली होती. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा 10 जूनला दिला होता. मात्र, याबाबत काल खुलासा केला आहे. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू आता पुढे काय निर्णय घेणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. 


पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद आहेत. लोकसभा निवडणुकांनंतर पंजाबमधील मंत्रिमंडळाच्या झालेल्या पहिल्या बैठकीला हजर न राहता त्याऐवजी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. तर, निवडणुकांत पंजाबच्या शहरी भागामध्ये काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे असलेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे खाते काढून घेण्याचा विचार पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी बोलून दाखविला होते. त्याप्रमाणे नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडील स्थानिक स्वराज्य संस्थांचे खाते काढून घेऊन त्यांना ऊर्जामंत्री करण्यात आले होते. त्यामुळे अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील मतभेद विकोपाला गेले होते.


(नवज्योत सिद्धू देणार राजीनामा?; राजकीय संन्यास घेणार का?)

नवज्योतसिंग सिद्धू यांना 'आप'ची ऑफर
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील शाब्दिक चकमक अद्याप थांबलेली नाही. त्यातच नवज्योतसिंग सिद्धू यांना आम आदमी पक्षातून ऑफर देण्यात आली होती. पंजाब विधासभेतील विरोधीपक्षनेते हरपाल सिंग चीमा यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना आम आदमी पक्षात येण्याची ऑफर दिली होती. नवज्योतसिंग सिद्धू यांचा आम आदमी पक्षात पुरेसा मानसन्मान केला जाईल, अशी ग्वाही देखील हरपाल सिंग यांनी दिली होती. 

Web Title: Navjot Singh Sidhu: Today I have sent my resignation to Punjab Chief Minister.