Navjot Singh Sidhu: नवज्योत सिंग सिद्धूंनी घेतला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे; पण काँग्रेससमोर ठेवली ‘ही’ अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 19:48 IST2021-11-05T19:47:24+5:302021-11-05T19:48:06+5:30
Navjot Singh Sidhu: सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी राजीनामा मागे घेत आहे, असे नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.

Navjot Singh Sidhu: नवज्योत सिंग सिद्धूंनी घेतला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे; पण काँग्रेससमोर ठेवली ‘ही’ अट
चंडीगड: गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसमधील राजीनामा देऊन नवीन पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे काँग्रेससमोरील आव्हाने वाढताना दिसत आहेत. यातच आता नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी आपला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतला आहे. यामुळे पंजाबमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आल्याचे सांगितले जात आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी कारभार स्वीकारण्याची अट घातली आहे. नवीन एजी आणि डीजीपीचे नवे पॅनल आल्यावर पक्ष कार्यालयातील काम हाती घेईन, असे सिद्धू यांचे म्हणणे आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी चरणजीत सिंग चन्नी सरकारच्या नियुक्तीचा निषेध करत राजीनामा दिला होता. चंडीगडमध्ये पत्रकार परिषद घेऊन नवज्योत सिंग सिद्धू यांनी याबाबतची माहिती दिली.
मी माझा राजीनामा मागे घेत आहे
मी माझा राजीनामा मागे घेत आहे. नवे एजी आणि डीजीपीचे नवे पॅनल आल्यावर पक्ष कार्यालयातील काम हाती घेईन. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी राजीनामा मागे घेत आहे, असे नवज्योत सिंग सिद्धू यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, पंजाबचे पोलीस महासंचालक, आणि अॅडव्हकेट जनरल यांची बदली करावी, यासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांनी २८ सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. पंजाबच्या विकासाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करू इच्छित नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. जरी राजीनामा दिला असला तरीदेखील काँग्रेससाठी यापुढेही काम करतच राहील, असे सिद्धू यांनी या पत्रात म्हटले होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिखांचा पवित्र ग्रंथ असलेल्या गुरु ग्रंथ साहिबचा अवमान केल्याप्रकरणी पंजाबमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये गोळीबार झाला होता. गोळीबार प्रकरणी सिद्धू यांनी त्यांच्याच पक्षाचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर आरोप केले होते. नवे मुख्यमंत्री आल्यानंतरही ५० दिवस उलटूनही गुरु ग्रंथ साहिब अवमान प्रकरणात आणि ड्रग्स प्रकरणात कोणतीही कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच पोलीस महासंचालक आणि अॅडव्हकेट जनरल यांची बदली करावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती.