NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:59 IST2025-11-19T12:58:17+5:302025-11-19T12:59:22+5:30
National Water Award: राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते आयुक्तांनी नवी दिल्लीत स्वीकारला जल पुरस्कार!

NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली/नवी मुंबई : भारत सरकारचे जलशक्ती मंत्रालय आयोजित ‘सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४’ अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महापालिकेेने देशात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार पटकावला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे मंगळवारी आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
नवी मुंबई महापालिकेची सुयोग्य जलवितरण प्रणाली आणि पाण्याचा पुनर्वापर अशा उल्लेखनीय बाबींचा विचार राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी करण्यात आला. जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्काराकरिता देशभरातून ७५१ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्या प्रस्तावांची जलसंपदा विभागाकडून तपासणी करण्यात आली, तसेच केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय भूजल मंडळांनी प्रत्यक्ष भेटी देत पाहणी करून तपशीलवार अहवाल सादर केले. त्यानंतर स्वतंत्र निर्णायक मंडळाने पारदर्शक स्कोअरकार्ड प्रणाली वापरून त्रयस्थ ज्युरी समितीद्वारे मूल्यांकन केले. मूल्यांकनाच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली असून स्थानिक स्वराज संस्था गटात नवी मुंबई महापालिका देशात प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय जल पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
राज्यातील दोन संस्थांनी पटकावला पुरस्कार
महाराष्ट्रातील इतर दोन संस्थांनाही महत्त्वाच्या श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले. ‘सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था’ या गटात नवी मुंबई पालिकेने प्रथम क्रमांक पटकावला. हा पुरस्कार आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वीकारला. ‘सर्वोत्कृष्ट जलवापरकर्ता संस्था’ नाशिक जिल्ह्यातील कानिफनाथ जल/पाणी वापर सहकारी संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केला.
महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट राज्य’ पुरस्कार अभिमानाची बाब
सदन येथे माध्यमांशी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट राज्य’ म्हणून सन्मान प्राप्त होणे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. बंद नलिका वितरण प्रणाली, उपसा सिंचन प्रकल्पांचे आधुनिकीकरण, नदी जोड प्रकल्प, पम्पिंग स्टोरेज योजना, जलाशयांवर फ्लोटिंग सौर प्रकल्प आणि सांडपाणी शुद्धिकरण-पुनर्वापर या सहा अभिनव संकल्पनांमुळे महाराष्ट्राला हे यश मिळाले आहे.
नवी मुंबई महापालिकेचे नियोजनबद्ध पाणीपुरवठा व्यवस्थापन व पाण्याचा पुनर्वापर या महत्त्वाच्या बाबींचा सर्वंकष विचार करून अग्रगण्य स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून देशपातळीवर प्रथम क्रमांकाचा मानाचा राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान मिळाला आहे. नवी मुंबईचा राष्ट्रीय पातळीवर झालेला गौरव शहराची मान उंचावणारा आहे. पुरस्काराच्या यशात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच वनमंत्री आणि खासदार व आमदार अशा सर्व लोकप्रतिनिधींचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन मोलाचे ठरले. डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका