पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी अजून काश्मीरमध्येच?; चौघांचा कट NIA ने आणला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 16:23 IST2025-05-01T16:19:20+5:302025-05-01T16:23:15+5:30

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने महत्त्वाची माहिती दिली आहे.

National Investigation Agency has made a big claim regarding the terrorists in the Pahalgam attack | पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी अजून काश्मीरमध्येच?; चौघांचा कट NIA ने आणला समोर

पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी अजून काश्मीरमध्येच?; चौघांचा कट NIA ने आणला समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याला एका आठवड्याहून अधिक दिवस झाले असून त्याबाबत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहिम राबवण्यात येत आहे. पहलगाम हल्ल्यात चार दहशतवाद्यांनी २६ जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणाचा तपास सुरु केला असून महत्त्वाची बाब समोर आली आहे. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरमध्ये लपलेले असल्याचे ठोस संकेत मिळाल्याचे एनआयएचे म्हणणं आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी अजूनही सक्रिय असल्याचे एनआयएच्या तपासातून समोर आलं आहे. मात्र भारतीय लष्कर किंवा जम्मू-काश्मीर पोलिसांनी याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात बैसरन व्हॅलीमध्ये प्रवेश केला होता. ते योग्य संधीची वाट पाहत होते. २२ एप्रिल रोजी त्यांनी बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांची हत्या केली आणि पळ काढला.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एनआयएच्या सूत्रांनी दावा केला की पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी दक्षिण काश्मीरमध्ये लपून बसले आहेत. या भागात आणखी दहशतवादी लपून बसल्याची माहिती देखील समोर आली आहे. बैसरनमधील हल्ल्यादरम्यान इतर दहशतवादी काही अंतरावर होते आणि त्यांनी कव्हर फायर देऊन त्या दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय एनआयएला आहे.

एनआयएने हल्ल्यातील वाचलेल्यांचे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. दहशतवाद्यांनी व्हॅलीमध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे बंद केले होते आणि पर्यटकांना अडकवून ठेवले होते. या हल्ल्यात ४ दहशतवादी सहभागी होते. यापैकी २ जण मुख्य दरवाजातून आत आले आणि १ जण बाहेर पडण्याच्या गेटवर उपस्थित होता. तर, चौथा दहशतवादी बॅकअप म्हणून जंगलात लपला होता. त्यानंतर संधी पाहून आतल्या तिन्ही दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. २ दहशतवादी लष्कराच्या गणवेशात होते. तर, तिसरा पारंपारिक काश्मिरी कपड्यांमध्ये होता. सुरुवातीला, बाहेर पडण्याच्या गेटवर गोळीबार झाला, त्यानंतर घाबरुन लोक प्रवेशद्वाराकडे धावले. तिथे आधीच उपस्थित असलेल्या दोन दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

दरम्यान, चहा आणि भेळपुरी स्टॉल्सपासून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला होता. काही मिनिटांमध्येच चौघांची हत्या केल्यानंतर दहशतवादी पुढे गेले होते. हल्ल्यानंतर दहशतवादी व्हॅलीमधील भिंतीवरुन उडी मारुन जंगलात पळून गेले. दहशतवाद्यांनी हा हल्ला करण्यापूर्वी १५ एप्रिल रोजी बैसरानची रेकी केली होती असेही म्हटलं जात आहे.
 

Web Title: National Investigation Agency has made a big claim regarding the terrorists in the Pahalgam attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.