'गरीब महिलेचा छळ का करताय?' गुलाम नबी आझाद यांचा ईडी-केंद्रावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 17:37 IST2022-07-27T17:37:23+5:302022-07-27T17:37:42+5:30
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज तिसर्यांदा ईडीने चौकशी केली.

'गरीब महिलेचा छळ का करताय?' गुलाम नबी आझाद यांचा ईडी-केंद्रावर हल्लाबोल
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची आज तिसर्यांदा ईडीने चौकशी केली. बुधवारी सोनिया गांधी यांची तीन तास चौकशी करण्यात आली. यापूर्वी मंगळवारी सहा तास आणि 21 जुलै रोजी दोन तास चौकशी करण्यात आली होती. बुधवारच्या चौकशीपूर्वी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी या चौकशीवरुन केंद्रावर निशाणा साधला.
सोनिया गांधींना बोलावणे योग्य नाही
गुलाम नबी आझाद म्हणाले, "पूर्वी खुल्या मैदानात युद्ध व्हायचे, दोन्ही बाजुच्या राजांकडून आदेश दिला जायचा की, युद्धादरम्यान महिला आणि आजारी व्यक्तींवर वार करू नका. पूर्वीच्या युद्धांमध्ये या आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हायचे. आताही तसेच व्हायला हवे. त्यामुळे मी केंद्र सरकार आणि ईडीला विनंती करतो की, सोनिया गांधींना त्रास देऊ नका, त्यांना वारंवार ईडीसमोर बोलावणे योग्य नाही.''
एका बिचाऱ्या महिलेला का त्रास देता?
ते पुढे म्हणाले की, "ईडीकडे सर्व कागदपत्रे आहेत, राहुल गांधी यांची अनेक तास चौकशी करण्यात आली आहे. मग आता एका बिचाऱ्या महिलेला त्रास का देत आहात?" असा सवालही आझाद यांनी उपस्थित केला. दरम्यान, सोनिया गांधी यांना नुकतीच कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले, त्यामुळे त्या ईडीच्या चौकशीला यापूर्वी हजर राहू शकल्या नव्हत्या.