"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 20:43 IST2025-04-21T20:27:10+5:302025-04-21T20:43:20+5:30
नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाविरुद्ध सत्तेचा गैरवापर होत असल्याचे पी चिदंबरम यांनी म्हटले.

"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
P. Chidambaram on ED Action: नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ईडीने राऊस अव्हेन्यू कोर्टात हे आरोपपत्र दाखल केले असून २५ एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या कारवाईविरोधात काँग्रेसने देशभरात ईडीच्या विरोधात आंदोलन देखील केले होते. त्यानंतर आता माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी टीका केली आहे. या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा खटला कुठे आहे? असा सवाल पी. चिदम्बरम यांनी केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणातील आरोपपत्र हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रामाणिकपणा आणि प्रतिष्ठेला कलंकित करण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आल्याचे म्हटलं आहे. पी. चिदम्बरम यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा बचाव करताना चिदम्बरम यांनी ईडीला या प्रकरणात चौकशी करण्याचा अधिकार नसल्याचा दावा केला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे मनी ट्रेल नसल्याचे पी. चिदम्बरम यांनी म्हटलं.
पी. चिदम्बरम यांनी पत्रकार परिषद घेत नॅशनल हेराल्ड प्रकरणावरुन ईडीच्या कारवाईवरुन ताशेरे ओढले."नॅशनल हेराल्ड प्रकरणात, यंग इंडिया आणि असोसिएट जनरलने कोणत्याही शेअरहोल्डर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला एक पैसाही दिला नाही. ईडीने कुठूनही एक पैसाही जप्त केला नाही, मग हा मनी लाँड्रिंगचा खटला कसा असू शकतो? राजकीय द्वेषामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीकडून त्रास दिला जातोय. जोपर्यंत कुठूनही पैशाचा व्यवहार झाल्याचे किंवा कोणताही चुकीचा व्यवहार झाल्याचे आढळत नाही, तोपर्यंत मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही," असे पी. चिदम्बरम म्हणाले.
"पैशाचा व्यवहार होत नाही तोपर्यंत गुन्हेगारी कृत्य होत नाही ही साधी गोष्ट आहे. गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्नाशिवाय मनी लाँडरिंगही होत नाही. त्यामुळे मनी लाँडरिंगशिवाय ईडीला गुन्हा नोंदवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या प्रकरणावरुन स्पष्ट होतंय की, ईडी, त्यांच्या राजकीय मालकांच्या इशाऱ्यावर काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध सूडबुद्धीने वागत आहे. यात गुन्हा कुठे आहे? गुन्ह्यातून मिळणारे उत्पन्न कुठे आहे? कुठे आहे तो पैसा? मनी लाँड्रिंगचा गुन्हा कुठे आहे?," असाही सवाल पी. चिदम्बरम यांनी केला.