देश आर्थिक संकटाकडे लोटला जात असताना भाजपा फक्त विरोधकांवर टीका करण्यात मग्न: ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 18:22 IST2022-04-05T18:20:53+5:302022-04-05T18:22:27+5:30
देश आर्थिक संकटात लोटला जात असताना केंद्र सरकार मात्र विरोधी पक्षांचं ज्या राज्यात सरकार आहे त्यांच्यावर टीका करण्यात व्यग्र आहे, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केला आहे.

देश आर्थिक संकटाकडे लोटला जात असताना भाजपा फक्त विरोधकांवर टीका करण्यात मग्न: ममता बॅनर्जी
कोलकाता-
देश आर्थिक संकटात लोटला जात असताना केंद्र सरकार मात्र विरोधी पक्षांचं ज्या राज्यात सरकार आहे त्यांच्यावर टीका करण्यात व्यग्र आहे, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केला आहे. मोदी सरकारचं लक्ष फक्त विरोधी पक्षाच्या सरकारांवर आहे. त्यांच्याकडून सीबीआय किंवा इतर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून भाजपा विरोधी राज्यांमध्ये सरकार चालवलं जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला.
"देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. श्रीलंकेत काय घडतंय ते आपण पाहातच आहोत. भारताची आर्थिक परिस्थिती काही फारशी चांगली नाही. मी काही श्रीलंकेशी तुलना करत नाही. पण आपल्याकडे काहीच प्लानिंग दिसून येत नाही. पेट्रोलच्या दरात गेल्या पंधरा दिवसात तब्बल ११ वेळा वाढ झाली आहे. तर डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती लक्षणीयरित्या वाढत आहेत. पीएफवरील व्याजदरातही मोठी कपात झाली आहे", असं बॅनर्जी म्हणाल्या.
'केंद्रानं ईडी, सीबीआयपेक्षा पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर लक्ष द्यावं'
विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये ईडी आणि सीबीआयचा कसा वापर करता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा केंद्र सरकारनं इंधन दरवाढ कशी रोखता येईल त्याकडे लक्ष द्यावं, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. महागाई हा सर्वसमावेशक मुद्दा असून केंद्रानं तातडीनं या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलवून माहिती जाणून घ्यावी आणि सरकार त्यावर काय काम करत आहे त्याची माहिती द्यावी, असं आवाहनही बॅनर्जी यांनी केलं आहे.