नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 06:58 IST2026-01-01T06:58:04+5:302026-01-01T06:58:40+5:30
या ६ पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमुळे पीएम गतिशक्तीशी सुसंगत असलेला हा परिवर्तनकारी प्रकल्प प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करेल, पश्चिम–पूर्व संपर्क अधिक मजबूत करेल, लॉजिस्टिक्सला चालना देईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
नवी दिल्ली : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने महाराष्ट्राला मोठे बक्षीस दिले आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने बुधवारी नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी दिली. हा महामार्ग ३७४ किमी लांबीचा सहा पदरी असून यावर १९,१४२ कोटी रूपये खर्च येणार आहे. हा कॉरिडॉर बीओटी तत्त्वावर आहे.
या ६ पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमुळे पीएम गतिशक्तीशी सुसंगत असलेला हा परिवर्तनकारी प्रकल्प प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करेल, पश्चिम–पूर्व संपर्क अधिक मजबूत करेल, लॉजिस्टिक्सला चालना देईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाने बीओटी (टोल) पद्धतीने ३७४ किलोमीटर लांबीच्या आणि १९१४२ कोटींच्या सहा-पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरच्या कामास मंजुरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे मनापासून धन्यवाद! हा प्रकल्प नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरांना कुर्नूलशी जोडून जलद, सुरक्षित आणि सक्षम कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणार असून, पीएम गतिशक्ती योजनेंअंतर्गत अखंड, समन्वित आणि आधुनिक दळणवळण व्यवस्थेच्या उभारणीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
या कॉरिडॉरचा फायदा -
हा महामार्ग नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार असून हा मार्ग कुरनुलशी जोडणार आहे. या कॉरिडॉरमुळे १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर कमी होणार आहे. नाशिक-अक्कलकोट कनेक्टिव्हिटीमुळे कोप्पार्ती आणि ओरवाकल या प्रमुख राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास महामंडळ (एनआयसीडीसी) नोड्सवरील मालवाहतूक जलद गतीने होणार आहे.
हा महामार्ग वाढवण पोर्ट इंटरचेंजजवळील दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे, नाशिकमधील एनएच-६० (अडेगाव)च्या जंक्शनवरील आग्रा-मुंबई कॉरिडॉर आणि नाशिकजवळील पांगरी येथील समृद्धी महामार्गाशी जोडला जाईल.
हा प्रकल्प हाय-स्पीड कॉरिडॉर आहे. यामुळे प्रवासाचा वेळ, गर्दी आणि ऑपरेटिंग खर्च कमी होईल. चेन्नई बंदर ते तिरुवल्लूर, रेणीगुंटा, कडप्पा आणि कुरनूल मार्गे चेन्नई ते हसापूरपर्यंत (महाराष्ट्र सीमा) ७०० किमी लांबीच्या चौपदरी कॉरिडॉरचे बांधकाम आधीपासूनच सुरू आहे.