Narendra Modi uses poison of hatred to divide this country - Rahul Gandhi | देशामध्ये फूट पाडण्यासाठी मोदी करताहेत द्वेषाच्या विषाचा वापर, राहुल गांधींची टीका
देशामध्ये फूट पाडण्यासाठी मोदी करताहेत द्वेषाच्या विषाचा वापर, राहुल गांधींची टीका

वायनाड - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या वायनाड या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राहुल गांधी यांनी वायनाड येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. ''नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी खोटेपणाचा वापर केला. मोदी हे देशातील जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी द्वेषाच्या विषाचा वापर करत आहेत,'' असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. 

वायनाड येथे सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी आक्रमक भाषेत नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. आज राष्ट्रीय पातळीवर आम्ही विषाशी लढा देत आहोत. मी कठोर शब्द वापरतोय, असे तुम्हाला वाटत असेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेमध्ये फूट पाडण्यासाठी द्वेषाच्या विषाचा वापर करत आहेत. राग आणि द्वेषाचा वापर करून ते देशातील जनतेमध्ये फूट पाडत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी खोटेपणाचा आधार घेत आहेत." असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात वाईट भावनेचे प्रतिनितित्व करतात. ते राग, द्वेष, भीती आणि खोटेपणाचे प्रतिनिधित्व करतात,'' अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. यावेळी सर्वसामान्यांसाठी आपले दरवाजे नेहमीच उघडे असतील, असेही राहुल गांधी यांनी सांगितले. 

''कुठल्याही क्षेत्रातील, कुठल्याही विचारसरणीचे आणि कुठल्याही वयाच्या व्यक्ती आम्हाला भेटू शकतात. मी काँग्रेसशी संबंधित असलो तरी कुणासाठीही माझ्या घराचे दरवाजे नेहमीच उघडे असतात,'' असे राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. पैकी अमेठीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर केरळमधील वायनाडमध्ये राहुल गांधी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. या विजयानंतर राहुल गांधी प्रथमच आपल्या नव्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज वायनाड येथील कालपेट्टा येथे रोड शो केला.  


Web Title: Narendra Modi uses poison of hatred to divide this country - Rahul Gandhi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.