“NDAचे सरकार पुढील १० वर्षे असणार, काँग्रेस १००चा आकडाही गाठू शकणार नाही”: नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 15:21 IST2024-06-07T15:19:56+5:302024-06-07T15:21:55+5:30
Narendra Modi Speech In NDA Meeting: इंडिया आघाडी सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकले नाहीत. काँग्रेसला १० वर्षांत जेवढ्या जागा मिळाल्या, तेवढ्या आम्हाला या निवडणुकीत मिळाल्या, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

“NDAचे सरकार पुढील १० वर्षे असणार, काँग्रेस १००चा आकडाही गाठू शकणार नाही”: नरेंद्र मोदी
Narendra Modi Speech In NDA Meeting: एनडीएचा कोणत्याही पक्षाचा कुणीही खासदार असला तरी तो माझ्यासाठी समानच असेल. सत्ता स्थापनेनंतर संसदेत आणि बाहेर सर्वच माझ्यासाठी समान आहेत. एनडीएमध्ये आपला आणि परका कुणी नाही. यामुळेच आम्ही जनतेचा विश्वास जिंकू शकतो. एनडीएतील घटक पक्षांनी अशा पद्धतीने काम केले. त्यामुळेच आम्हाला यश मिळू शकले, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले. संसदेच्या सेंट्रल हॉलमधील खासदारांच्या बैठकीत नरेंद्र मोदी बोलत होते.
सत्ता स्थापनेपूर्वी एनडीएतील घटक पक्षांचे प्रमुख आणि निवडून आलेल्या खासदारांच्या बैठकीला नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. ०९ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. पुढील १० वर्षांनीही काँग्रेस पक्ष १०० चा आकडा पार करू शकणार नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या, त्या आम्हाला या एका निवडणुकीत मिळाल्या आहेत. इंडिया आघाडी पूर्वी हळूहळू बुडत होते. आता तर गतीने गर्तेत जाणार आहे, या शब्दांत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसह इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला.
पुढील दहा वर्षांत एनडीएचे सरकार असणार
केवळ सत्ता प्राप्त करणे किंवा सरकार चालविण्यासाठी नाही, तर राष्ट्र प्रथम या मूळ भावनेतून एनडीएचा समूह एकत्र आला आहे. ३० वर्षांच्या या मोठ्या कार्यकाळात एनडीए एक नैसर्गिक आघाडी म्हणून पुढे आली आहे. आमच्याकडे महान नेत्यांचा वारसा आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. मागच्या १० वर्षांत आम्ही हा वारसा घेऊन देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पुढील दहा वर्षांत एनडीएचे सरकार असणार, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, इंडिया आघाडी देशातील सामान्य नागरिकांच्या भावना समजू शकले नाहीत. मी आशा करतो की ते लोकशाहीचा सन्मान करतील. लोकशाही आपल्याला सर्वांचा आदर करायला शिकवते. विरोधी पक्षातही जे खासदार जिंकून आले आहेत, मी त्यांचंही अभिनंदन करतो. गेल्या १० वर्षांपासून मला एका गोष्टीची उणीव जाणवत होती. सखोल चर्चा, उत्तम वाद-विवाद या गोष्टींची उणीव भास होती, या नव्या खासदारांच्या निमित्ताने ही उणीव कमी भासेल, अशी अपेक्षा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.