सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 05:42 IST2025-10-03T05:41:30+5:302025-10-03T05:42:30+5:30
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात लवकरच होणाऱ्या विशेष पुनरावलोकन मोहिमेत (एसआयआर) बिहारसारखीच प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तिथे लाखो मृत ...

सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात लवकरच होणाऱ्या विशेष पुनरावलोकन मोहिमेत (एसआयआर) बिहारसारखीच प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तिथे लाखो मृत व्यक्तींची नावे अनेक वर्षांनंतर मतदार यादीतून हटवण्यात आली होती. निवडणूक आयोगाचे मत आहे की, जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली, की मतदार यादीत मृत व्यक्तींची नावे राहण्याचा प्रश्न कायमचा सुटेल.
बिहारमध्ये एसआयआर मोहिमेची सुरुवात होण्याआधी मतदारांची संख्या ७.८९ कोटी इतकी होती. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मसुदा यादीत मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत खाली घसरली. या यादीतून जवळपास ६५ लाख नावे हटवण्यात आली. त्यात २२ लाख मृत व्यक्तींचा समावेश होता.
ज्ञानेश कुमार म्हणाले...
गेल्या ऑगस्ट महिन्यात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले होते की, बिहारमध्ये ज्या २२ लाख मृत व्यक्तींची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली, त्यांचा मृत्यू नुकताच नव्हे तर काही वर्षांपूर्वी झाला होता. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल त्याच्या कुटुंबातील लोकच माहिती देत नाहीत, त्यावेळी तेव्हा बीएलओ याबाबत नोंद कशी करणार, असा सवालही त्यांनी केला होता.
मतदार यादी आणखी अचूक करण्यासाठी...
मतदारयाद्या लवकरात लवकर अद्ययावत व त्रुटीरहित करण्यासाठी, निवडणूक आयोग आता मृत्यू नोंदणीचा डेटा रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडून (आरजीआय) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मिळविणार आहे.
त्यामुळे निवडणूक नोंदणी अधिकारी यांना एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूबाबतची माहिती वेळेवर मिळेल व बीएलओ त्याची पडताळणी करू शकतील. त्यासाठी मृत व्यक्तीच्या नातेवाइकांकडून ती माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार नाहीत. आरजीआय, महापालिका आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी डेटा लिंकिंग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मतदार यादी आणखी अचूक होईल, असे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.