उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 23:38 IST2025-12-26T23:35:17+5:302025-12-26T23:38:19+5:30
SIR In Uttar Pradesh: सध्या उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या एसआयआर बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये एसआयआरच्या प्रक्रियेनुसार मतदार यादीमधून तब्बल २ कोटी ८९ लाख मतदारांची नावं वगळली जाणार आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर
सध्या उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या एसआयआर बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये एसआयआरच्या प्रक्रियेनुसार मतदार यादीमधून तब्बल २ कोटी ८९ लाख मतदारांची नावं वगळली जाणार आहेत. तर सुमारे १.१ कोटी लोकांना नोटिस पाठवली जाणार आहे. या लोकांना निवडणूक आयोगाकडे आपली कागदपत्रे सोपवावी लागतील. उत्तर प्रदेशमध्ये एसआयआरचे अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवार २६ डिसेंबर रोजी रात्री १२ पर्यंत आहे. तर ३१ डिसेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध होईल. उत्तर प्रदेशमध्ये ११ डिसेंबरपर्यंत २.९१ कोटी मतदारांनी आपले एसआयआर अर्ज जमा केले नव्हते. त्यानंतर मुदत वाढवल्यानंतरही १५ दिवसांमध्ये केवळ १० लाख मतदारांनीच आपले अर्ज जमा केले आहेत. दरम्यान, ३१ डिसेंबर नंतर १.११ कोटी लोकांना कागदपत्रं सादर करण्यासाठी नोटिस पाठवली जाणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल.
एसआयआर प्रक्रियेंतर्गत उत्तर प्रदेशमधून ज्या २.८ कोटी मतदारांची नावं वगळली जाणार आहेत. त्यामधील सुमारे १.२६ कोटी मतदार हे स्थलांतरित झालेले आहेत. ४६ लाख मतदारांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय तब्बल २३.७० लाख दुबार मतदार होते. तसेच तब्बल ८३.७३ लाख मतदार अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. तसेच इतर कारणांमुळे ९.५७ लाख मतदारांची नावंही वगळली जाणार आहेत.
या प्रक्रियेदरम्यान, सुमारे १.११ कोटी मतदारांना नोटिस बजावली जाईल. तसेच वैध कागदपत्रे दाखवल्यानंतर त्यांना मतदार बनता येणार आहे. एसआयआरच्या यादीबाबत ३१ डिसेंबरपासून ३० जानेवारीपर्यंत दावे आणि आक्षेप नोंदवता येणार आहेत. तसेच ३१ डिसेंबरपासून २१ फेब्रुवारीपर्यंत नोटिशीच्या टप्प्यात दावे आणि आक्षेपांचं निराकरण होणार आहे. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.