‘राणी’च्या नावावर आहे केवळ साडेतीन गुंठे जमीन; स्वत:चे घर नाही, वाहनही नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 05:45 IST2018-11-22T05:44:24+5:302018-11-22T05:45:02+5:30
दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी झालेल्या वसुंधरा राजे यांनी स्वत:च्या मालकीचे घर व गाडी नसल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या नावे केवळ साडेतीन गुंठ्याचा भूखंड असल्याचे म्हटले आहे.

‘राणी’च्या नावावर आहे केवळ साडेतीन गुंठे जमीन; स्वत:चे घर नाही, वाहनही नाही!
- सुहास शेलार
जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरलेल्या उमेदवारांनी जाहीर केलेल्या विवरणपत्रांमधून मोठी रंजक आणि आश्चर्यकारक माहिती पुढे आली आहे. दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी झालेल्या वसुंधरा राजे यांनी स्वत:च्या मालकीचे घर व गाडी नसल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या नावे केवळ साडेतीन गुंठ्याचा भूखंड असल्याचे म्हटले आहे.
राजे यांची एकूण संपत्ती ४ कोटी ९ लाख ८२ हजार रुपयांची आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती ४३.३१ लाखांनी वाढली. शिवाय त्यांच्याकडे ३१ तोळे सोने व १५ किलो चांदी आहे. त्यांच्याविरुद्ध झालरापाटणमधून उभे असलेले मानवेंद्र सिंह यांची संपत्ती ‘राजे’ यांच्या तुलनेत दुप्पट आहे. मानवेंद्र यांची संपत्ती ९ कोटी ६६ लाख इतकी आहे.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपली संपत्ती ६ कोटी ४४ लाख असल्याचे म्हटले आहे. त्यात २४ तोळे सोन्याचाही समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती ४ कोटी ७४ लाखांनी वाढली. तर प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्याकडे ६ कोटी ३९ लाखांची संपत्ती आहे. असल्याचे त्यांनी आपल्या विवरणपत्रात नमूद केले आहे. पायलट यांच्याविरुद्ध भाजपाचे परिवहनमंत्री युनुस खान यांची एकूण संपत्ती ६५ कोटी ४० लाख रुपये इतकी आहे.
राजस्थानातील कोट्यधीश उमेदवारांच्या यादीत काँग्रेसचे रफिक खान, महेश जोशी, भाजपाच्या सिद्धी कुमारी, अशोक लोहाटी यांचाही समावेश आहे.
कामिनी जिंदल श्रीमंत उमेदवार
राजस्थानात कामिनी जिंदल या सर्वात श्रीमंत उमेदवार असून, त्यांची एकूण संपत्ती २८७.९६ कोटी इतकी आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती ९३ कोटींनी वाढली. कामिनी यांनी २०१३ साली वयाच्या २५ व्या वर्षी वडिलांच्या ‘नॅशनल युनियनिस्ट जमीनदारा पार्टी’तर्फे निवडणूक लढवली. यात प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवाराचा ३७ हजार मतांनी पराभव केला. राजस्थान विधानसभेतील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान त्यांनी त्यावेळी पटकावला. त्यांचे पती गगनदीप सिंगला हे राजस्थान केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
तितर सिंह यांची संपत्ती शून्य
मजूर म्हणून काम करणारे ७0 वर्षांचे तितर सिंह करणपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून नवव्यांदा निवडणूक लढत आहेत. विवरणपत्रात त्यांनी आपली संपत्ती शून्य रुपये लिहिली आहे. लोकांनी दान म्हणून दिलेल्या पैशांनी ते निवडणूक लढवत आहेत. एकदा तरी विजय मिळावा, या आशेनेच ते पुन्हा मैदानात उतरले आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद व विधानसभा मिळून आतापर्यंत त्यांनी २४ निवडणुका लढविल्या आहेत.
नाणी मोजताना अधिकाºयांना फुटला घाम
बकानेर पूर्व मतदारसंघातील उमेदवार मूलचंद नायक यांनी अनामत रक्कम म्हणून एक रुपयाची पाच हजार नाणी आणली. ती मोजताना निवडणूक अधिकाºयांना घाम फुटला. माझ्या कार्यकर्त्यांनी एक-एक रुपया जमवून मला ही रक्कम सोपविली. त्यांच्या सन्मानार्थ ही रक्कम निवडणूक अधिकाºयांना सादर केली आहे, असे ते म्हणाले; पण यामुळे अधिकाºयांची पंचाईत झाली.