भाजपा खासदाराच्या पत्नीचे जमीन घोटाळ्यात नाव, कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल
By बाळकृष्ण परब | Updated: January 20, 2021 17:44 IST2021-01-20T17:42:48+5:302021-01-20T17:44:02+5:30
BJP MP Nishikant Dubey : झारखंडमधील गोड्डा येथून भाजपाचे खासदार असलेले निशिकांत दुबे यांच्या पत्नीविरोधात जमीन खरेदीच्या एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपायुक्तांच्या न्यायालयाने दिले आहेत.

भाजपा खासदाराच्या पत्नीचे जमीन घोटाळ्यात नाव, कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल
रांची -पत्नीचे नाव जमीन घोटाळ्यात आल्याने भाजपाचे खासदार निशिकांत दुबे हे अडचणी आले आहेत. झारखंडमधील गोड्डा येथून भाजपाचे खासदार असलेले निशिकांत दुबे यांच्या पत्नीविरोधात जमीन खरेदीच्या एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपायुक्तांच्या न्यायालयाने दिले आहेत. सोबतच न्यायालयाने एक व्यवहारसुद्धा रद्द केला आहे.
समोर आलेल्या वृत्तानुसार हा व्यवहार देवघरमधील चर्चित एलोकेसी धामशी संबंधित आहे. येथे एका कोठीचा व्यवहार झाला होता. या प्रकरणी आता उपायुक्तांच्या न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. या व्यवहारामध्ये ऑनलाइन एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणी झाली होती. खासदार निशिकांत दुबे यांच्या पत्नी अनामिका गौतम ह्या या कंपनीच्या प्रोपायटर आहेत.
या व्यवहाराची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी देवघरचे सब रजिस्ट्रार राहुल चौबे यांनी तक्रार दिली होती. उपायुक्तांच्या आदेशानंतर निशिकांत दुबे यांच्या पत्नी अनामिका गौतम यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होते. या प्रकरणी अनामिका गौतम यांच्यासह संजीव कुमार, कमल नारायण झा, देवता पांडे आणि सुमित कुमार सिंह यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींवर कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.