बिहारच्या दरभंगा येथे झालेल्या काँग्रेसच्या मतदार अधिकार यात्रेत पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करण्यात आली होती. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या व्यासपीठावरून मोदींच्या आईचा अपमान करण्यात आला. त्यावरून आज नरेंद्र मोदी यांनी भावूक प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस आणि राजदच्या व्यासपाठीवरून माझ्या आईला शिवीगाळ केली. हा अपमान फक्त माझ्या आईचा नाही, तर देशातील प्रत्येक आईचा, बहिणीचा आणि मुलींचा आहे असं मोदींनी म्हटलं.
बिहारच्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कमी दरात कर्ज उपलब्ध करणे, त्यांना आवश्यक डिजिटल सहकार्य करणे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या व्यासपाठीवरून झालेल्या शिवीगाळीचा उल्लेख केला. आईचा उल्लेख होताच ते भावूक झाले. भोजपुरी भाषेत त्यांनी बिहारमध्ये आईचं स्थान देवीदेवतांपेक्षा वरचं मानले जाते, माझ्या आईने गरिबी पाहिली आहे. आईचं आपलं जग असते, आईच आपला स्वाभिमान असतो. ही समृद्ध परंपरा असणाऱ्या बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी जे घडले, त्याची मी कल्पनाही केली नव्हती, बिहारमधल्या जनतेनेही हा विचार केला नव्हता असं त्यांनी सांगितले.
बिहारमध्ये आरजेडी-काँग्रेस व्यासपाठीवरून माझ्या आईला शिवी देण्यात आली. ही शिवी फक्त माझ्या आईचा अपमान नाही तर देशातील आई, बहीण आणि मुलींचा अपमान आहे. हे पाहून आणि ऐकून बिहारच्या प्रत्येक आईला किती वाईट वाटले असेल याची मला जाणीव आहे. मला माहिती आहे, माझ्या हृदयात जे दुःख आहे तेच दुःख बिहारच्या लोकांनाही आहे. म्हणूनच आज जेव्हा मी इतक्या मोठ्या संख्येने बिहारच्या लाखो माता आणि भगिनींना पाहत आहे, आज मी माझ्या मनातील दुःख तुमच्यासोबत शेअर करत आहोत. जेणेकरून तुमच्या माता आणि भगिनींच्या आशीर्वादाने मी हे सहन करू शकेन अशी भावनिक प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
दरम्यान, प्रत्येक आई आपल्या मुलाला मोठ्या तपस्येने सांभाळते, मुलांपेक्षा मोठं आईपुढे काहीच नसते. मी माझ्या आईला लहानपणापासून असेच पाहतोय. गरिबी आणि संकटाचा सामना करून माझ्या आईने आम्हा भावंडांना वाढवले. पाऊस पडायचा तेव्हा घरात छतातून पाणी गळू नये यासाठी ती मेहनत घ्यायची. स्वत: आजारी पडली तरी आम्हाला कळू द्यायची नाही. ती सतत काम करत राहायची. जर तिने एक दिवसही आराम केला तर मुलांना वेदना होतील हे तिला कळायचे. मुलांसाठी नवनवीन कपडे घ्यायची, स्वत: साडीही खरेदी करत नव्हती. देशातील कोट्यवधी आई असेच मुलांना सांभाळत असेल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.