माझ्या सुनेने कर्नाटकचे नाव उचांवले; तिचा मला अभिमान, कर्नल सोफिया कुरेशी यांच्या सासऱ्यांचे गौरवोद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:04 IST2025-05-09T12:01:37+5:302025-05-09T12:04:18+5:30
बेळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत, भारतीय सैन्य दलाने केलेल्या ‘ ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल ...

माझ्या सुनेने कर्नाटकचे नाव उचांवले; तिचा मला अभिमान, कर्नल सोफिया कुरेशी यांच्या सासऱ्यांचे गौरवोद्गार
बेळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत, भारतीय सैन्य दलाने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी या बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूरच्या स्नुषा आहेत. देशासाठी लढणाऱ्या माझ्या सुनेने बेळगावचेच नव्हे तर संपूर्ण कर्नाटकचे नाव उंचावले आहे. तिचा मला अभिमान आहे, असे त्यांचे सासरे गौससाब बागेवाडी यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले.
कर्नल सोफिया कुरेशी यांचे पती ताजुद्दीन बागेवाडी हे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावचे आहेत. ते भारतीय सैन्यात एका मॅकेनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सोफिया यांचे माहेर गुजरातमधील बडोदा आहे. कर्नल सोफिया सध्या जम्मूमध्ये सेवारत आहेत. त्यांचे आजोबा आणि वडीलही सैन्यात होते. सोफिया यांचा आपल्याला अत्यंत अभिमान असल्याचे सांगतानाच आपल्या सुनेने केलेले कार्य आमच्यासाठी तसेच बेळगाव जिल्हा आणि संपूर्ण राज्याची मान उंचावणारे आहे, असे गौससाब बागेवाडी म्हणाले.
पाकिस्तान पेरतोय भारतात धर्माचे विष
आम्ही सर्वजण येथे गुण्यागोविंदाने आणि एकोप्याने राहतो. मात्र, पाकिस्तानकडून भारतात धर्माचे विष पेरले जाते. पाकिस्तानच्या या हीन कृत्याला भारतीय लष्करी जवानाने चोख प्रत्त्युत्तर दिल्याचेही बागेवाडी यांनी सांगितले.