भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:00 IST2025-12-17T16:59:45+5:302025-12-17T17:00:21+5:30
१५ वर्षीय विद्यार्थिनीचा डीजेच्या मोठ्या आवाजामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

AI फोटो
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका १५ वर्षीय विद्यार्थिनीचा डीजेच्या मोठ्या आवाजामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी सुरू असलेल्या लग्नसमारंभात डीजेचा आवाज इतका प्रचंड होता की, ९वीत शिकणाऱ्या या मुलीला तो सहन झाला नाही आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली असून अशा 'डीजे'वर कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे.
मुजफ्फरनगरच्या अहरोडा गावात दोन दिवसांपूर्वी एका लग्नासाठी दिल्लीहून मोठा डीजे मागवण्यात आला होता. वरात निघत असताना डीजेचा आवाज आणि त्याचा 'बेस' इतका जास्त होता की, गावातील १५ वर्षीय राशी या विद्यार्थिनीला तो आवाज सहन झाला नाही. आवाजाच्या धक्क्याने तिला हार्ट अटॅक आला. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेलं, मात्र रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.
राशीचे आजोबा अजय पाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीजेचा आवाज इतका भयानक होता की घरातील जनावरंही घाबरून खुंटी तोडून पळू लागली होती. त्यांनी असाही आरोप केला की, या गावात डीजेच्या आवाजामुळे मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मनवीर मास्टर आणि नवाब प्रधान यांचा मुलगा हरेंद्र यांचा डीजेच्या मोठ्या आवाजामुळे हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे.
राशीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार न करता कुटुंबाने मुलीवर अंत्यसंस्कार केले आहेत. मात्र, "डीजेच्या नावाखाली सुरू असलेल्या या गोष्टीवर नियंत्रण मिळवा, जेणेकरून दुसऱ्या कोणाचं असं घर उद्ध्वस्त होणार नाही," अशी कळकळीची विनंती त्यांनी सरकारला केली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.