लग्नासाठी वारंवार भुणभुण करणा-या प्रेयसीची हत्या, अंत्यसंस्काराला आला असता ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 14:16 IST2017-09-13T14:16:17+5:302017-09-13T14:16:17+5:30
घरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. बारावीत शिकणारी तरुणी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.
_201707279.jpg)
लग्नासाठी वारंवार भुणभुण करणा-या प्रेयसीची हत्या, अंत्यसंस्काराला आला असता ठोकल्या बेड्या
हैदराबाद, दि. 13 - घरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. बारावीत शिकणारी तरुणी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. तपास केला असता प्रियकरानेच हत्या केल्याचं समोर आलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
चांदनी जैन असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. घरापासून पाच किमी अंतरावर टेकडीवर चांदनी जैनचा मृतदेह पोलिसांना आढळला. चांदनी जैनचा मित्र साई तिच्या घरी सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला अटक केली. हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
17 वर्षीय चांदनी जैन एका व्यवसायिकाची मुलगी आहे. शनिवारपासून ती बेपत्ता होती. आपल्या काही मित्रांना भेटायचं आहे असं सांगत ती घराबाहेर पडली होती. मात्र घरातून गेलेली ती पुन्हा परतलीच नाही. रात्री उशिरापर्यंत मुलीचा काहीच संपर्क होत नसल्याने कुटुंबाने अखेर पोलिसांत तक्रार दाखल केली. 'माझ्या बहिणीने आपण काही मित्रांना भेटण्यासाठी जात असल्याचं मला सांगितलं होतं. रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली. त्यानंतर आम्ही पोलिसांत जाऊन तक्रार केली', अशी माहिती चांदनी जैनची बहिण निवेदिताने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'चांदनी जैनला तिचा प्रियकर साई किरणशी लग्न करायचं होतं. लग्नासाठी वारंवार दबाव टाकत असल्याने साई किरणने प्रेयसीची हत्या केल्याची कबुली दिली आहे'.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी साई किरणला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चांदनी जैन आणि साई किरण एकत्र दिसत असल्याने पोलिसांना गुन्हा उलगडण्यात मदत मिळाली. चांदनी जैन साई किरणसोबत ऑटो रिक्षामधून बाहेर येत असल्याचं दिसत आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.
साई किरण आणि चांदनी जैन एकमेकांचे चांगले मित्र असून सहावी ते दहावीपर्यंत एकाच वर्गात शिकत होते. पोलिसांनी साई किरणची चौकशी केली असता त्याने सांगितलं की, 'चांदनी आणि मी गेल्या दोन वर्षांपासून संबंधात होतो. पण गेल्या दोन महिन्यांपासून तिला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत होतो. चांदनी आपल्यावर वारंवार लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती, त्यामुळे आपण तिच्यापासून सुटका करुन घेण्याचा निर्णय घेतला'.
शनिवारी, साई किरण चांदनीला एका टेकडीवर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्याशी भांडण केलं, आणि नंतर टेकडीवरुन ढकलून दिलं. 10 फूटावरुन खाली पडल्याने चांदनीचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह सापडला तेव्हा चांदनीची जीभ बाहेर असल्याने ही हत्या असल्याचा पोलिसांना संशय आला आणि त्यानुसार तपास करत त्यांनी आरोपी प्रियकराला अटक केली.