ठळक मुद्देप्रेयसीच्या चार वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना पूर्व दिल्लीमधील गाजीपूर येथे घडली आहेलग्न केल्यानंतर मुलीचाही स्विकार करावा अशी अट प्रेयसीने ठेवली होतीमुलीचा बाप होण्यास तयार नसल्याने त्याने हत्येचा कट रचला

नवी दिल्ली, दि. 13 - प्रेमात अडचण निर्माण करणा-या आपल्या प्रेयसीच्या चार वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना पूर्व दिल्लीमधील गाजीपूर येथे घडली आहे. आरोपी व्यक्तीचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले होते. तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. जेव्हा त्याने आपल्या लग्नाचा प्रस्ताव महिलेसमोर ठेवला तेव्हा तिने उत्तर देण्याआधी काही अटी ठेवल्या होत्या. अटीनुसार, तिच्या मुलीलाही स्वत:ची मुलगी म्हणून स्विकारलं पाहिजे, तसंच तिच्या शिक्षणाचा खर्चही उचलला जावा. प्रेयसीला मिळवण्यासाठी आतूर झालेल्या आरोपीला ही अट मान्य नव्हती. मुलीचा बाप होण्यास तयार नसल्याने त्याने हत्येचा कट रचला. 

2 सप्टेंबर रोजी चिमुरडी आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण घराबाहेर पडलेली ती पुन्हा परतलीच नाही. मुलगी घरी परत न आल्याने चिंताग्रस्त झालेल्या आईने सगळीकडे शोध घेतला. मुलगी न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी तात्काळ शोध घेण्यास सुरुवात केली. महिलेचा प्रियकर सोनू यानेदेखील आपण काहीच केलं नसल्याचा आव आणत पोलिसांना शोधकार्यात मदत करत असल्याचं नाटक केलं. 

आरोपी सोनूने लहान मुलांची तस्करी करणारी टोळी यामागे असल्याचं सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. हाती काहीच पुरावा लागत नसल्याने काही वेळासाठी पोलिसांनीही सोनूच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. 

9 सप्टेंबर रोजी, पोलिसांना एका निर्माणधीन इमारतीत लहान मुलीचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली. इमारतीच्या मालकानेच पोलिसांना फोन करुन ही माहिती दिली होती. इमारतीच्या मालकाने दिलेल्या माहितीमुळे पोलिसांच्या तपासाची दिशाच बदलली. कारण इमारत मालकाने सांगितलं की, सोनू नेहमी इमारतीत येत असतो. 

आपला गुन्हा उघडकीस आलं असल्याचं लक्षात येताच सोनूने घर सोडून पळ काढला. पण पोलिसांनी त्याचा शोध घेत दोन दिवसात अटक केली. यानंतर हत्येमागील खरं कारण उघड झालं. 

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने सोनू चिमुरडीला घेऊन गेला होता. इमारतीजवळ पोहोचल्यानंतर त्याने गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह तिथेच टाकून त्याने पळ काढला. यानंतर त्याने आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगितलं. एक वर्षापुर्वी त्याच्या प्रेयसीला म्हणजेच पीडित मुलीच्या आईला तिच्या नव-याने सोडलं होतं. यामुळे महिला भाड्याच्या घरात राहत होती. सोनू शेजारी राहत असल्याने त्यांच्यात लगेच मैत्री झाली, आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

जेव्हा महिलेच्या पतीला या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली, तेव्हा त्याने सोनूसोबत भांडणही केलं. पण तरीही त्यांचं प्रकरण सुरु होतं. सुरुवातीला सोनू मुलीला स्विकारण्यास तयार होता. पण नंतर त्याचं मन बदललं. यावरुन त्यांच्यात अनेकदा भांडणही होत असे. यामधून त्याने चिमुरडीची हत्या केली. आरोपीला फक्त पैशांसाठी लग्न करायचं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.