मुंबईच्या पायल पोकरणा यांनी आईच्या पार्थिवाला दिला खांदा, बनल्या कुटुंबाचा आधारस्तंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 07:57 IST2022-06-16T07:54:16+5:302022-06-16T07:57:04+5:30
प्रत्येक समाजाच्या अंत्यसंस्काराच्या काही चालीरीती असतात. जैन समाजात स्त्रिया बैकुंठी म्हणजे पार्थिवाला सहसा खांदा देत नाहीत.

मुंबईच्या पायल पोकरणा यांनी आईच्या पार्थिवाला दिला खांदा, बनल्या कुटुंबाचा आधारस्तंभ
रायपूर (छत्तीसगड) :
प्रत्येक समाजाच्या अंत्यसंस्काराच्या काही चालीरीती असतात. जैन समाजात स्त्रिया बैकुंठी म्हणजे पार्थिवाला सहसा खांदा देत नाहीत. मात्र मुंबईच्या पायल पोकरणा यांनी समाजाच्या चालीरीतीला छेद देत, आईच्या बैकुंठीला खांदा देत मुलाचे कर्तव्य पार पाडले. समाजातील एखाद्या महिलेकडून बैकुंठीला खांदा देण्याची ही पहिलीच घटना असल्याचे समाजातील जैन समाजातील जाणकारांनी सांगितले.
श्रीराम संगीत महाविद्यालयाजवळील बुढापारा येथील रहिवासी ६३ वर्षीय सरलादेवी कटारिया यांना मंगळवारी संथारा मरण आले. त्यांच्या मुलाचे आधीच निधन झाले असल्याने पश्चात केवळ मुलगी पायल पंकज पोकरणा आहे. पायल यांचे पती आणि सासरे मुंबईत सीए आहेत. आईची प्रकृती अस्वस्थ असून त्यांनी संथाराव्रत स्वीकारल्याचे कळताच मुंबईत राहणाऱ्या ४४ वर्षीय पायल तत्काळ आईच्या सेवेसाठी रायपुरात पोहचल्या. मागील १५ दिवसांपासून त्या आईची सेवा करीत होता. सरलादेवी यांना कॅन्सर झाला होता. परंतु जैन समाजातील संथारा या धार्मिक प्रथेचे अनुकरण करीत त्या समाधिस्थ राहिल्या व वेदनेपासून दूर राहिल्या. मंगळवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अंत्यसंस्कारासाठी बैकुंठीतून त्यांचे पार्थिव नेण्यात आले. समाजाच्या चालीरीतीनुसार बैकुंठीला मुलांनीच खांदा द्यायचा असतो. मात्र मुलगा नसल्याने पायलने मुलाचे कर्तव्य पार पाडले. बैकुंठीला खांदा देत त्या मुक्तिधामपर्यंत तासाभराचे
अंतर चालत गेल्या. दरम्यान, समाजातील ज्येष्ठांनी त्यांना घरी परत जाण्याचा आग्रह केला; पण आईवरील दृढ प्रेमापोटी मुक्तिधामपर्यंत खांदा
देत त्या चालत राहिल्या, एवढेच नाही तर दाहसंस्कारातही सहभागी झाल्या.
जैन समाजातील दुर्मिळ घटना - बरलोटाया
संदर्भात सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश बरलोटा म्हणाले, जैन समाजात पार्थिवाला खांदा फक्त पुरुषच देतात. मात्र या प्रसंगात मुलीने खांदा देण्याची दुर्मिळ घटना म्हणजे परिवर्तनाचे पाऊल ठरले आहे. पायल पोकरणा यांच्या भावनांचा समाजाने आदर केला असून या प्रसंगातून एक अनुकरणीय आदर्श समाजापुढे ठेवला गेला आहे.