Amarnath Yatra Landslide:जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेवर परिणाम झाला आहे. बुधवारी बालटालच्या रेलपाथरीम्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ८ यात्रेकरू जखमी झाले. तर एका महिलेचा मृत्यू झाला. अतिवृष्टीनंतर शेकडो यात्रेकरूंना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं. दुसरीकडे मृत्यू झालेल्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चिखलात कोसळ्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करुन महिलेला मृत घोषित केले. पावसामुळे अमरनाथ यात्रा आजच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी अमरनाथ यात्रेच्या बालटाल मार्गावर झालेल्या भीषण भूस्खलनात एका महिला यात्रेकरूचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. बालटाल मार्गावरून अमरनाथ गुहेकडे जात असलेले चार यात्रेकरू रेलपाथरी भागात भूस्खलनामुळे खाली कोसळले.जखमींना ताबडतोब बालटाल बेस कॅम्प रुग्णालयात नेण्यात आले, जिथे महिलेला मृत घोषित करण्यात आले. ५५ वर्षीय सोना बाई यांचा मृत्यू झाला असून त्या राजस्थानच्या रहिवासी असल्याचे समोर आलं आहे.
आतापर्यंत अमरनाथ यात्रेतील मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. यात्रेकरू ३,८८० मीटर उंचीवर असलेल्या पवित्र गुहेकडे जात असताना ही दुर्घटना घडली. हवामान खात्याने या भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाचा इशारा दिला होता, ज्यामुळे प्रशासनाने यात्रेकरूंना सतर्क राहण्याचा सल्ला दिला होता. पाऊस आणि खराब हवामान असूनही यात्रा सुरूच आहे. मात्र या दुर्घटनेनंतर यात्रा एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेसाठी शोक व्यक्त केला आहे.
ब्रारीमार्ग येथे तैनात असलेल्या लष्कराच्या तुकडीने तातडीने बचाव कार्य सुरू केले. या भागात अडकलेल्या सुमारे ५०० यात्रेकरूंना आश्रय देण्यात आला आणि त्यांना चहा आणि पिण्याचे पाणी देण्यात आले. याशिवाय ब्रारीमार्ग आणि झेड मोर दरम्यानच्या लंगरमध्ये आश्रय घेतलेल्या ३००० इतर यात्रेकरूंना अन्न देण्यात आले.
दरम्यान, अमरनाथ यात्रा ३ जुलै रोजी सुरू झाली आणि ९ ऑगस्ट रोजी संपणार आहे. या वर्षीही या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. बालटाल आणि पहलगाम मार्गावरून जाणाऱ्या या यात्रेच्या कठीण भागात यापूर्वीही दुर्घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीही मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अनेकदा यात्रा स्थगित करावी लागली होती.