संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:41 IST2025-11-07T17:39:24+5:302025-11-07T17:41:03+5:30
मध्य प्रदेशातील शेवपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
देशभरातील शाळांमध्ये लहान मुलं उपाशी राहू नये यासाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली होती. याच दरम्यान मध्य प्रदेशातील शेवपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एका सरकारी शाळेत मुलांना प्लेट किंवा पानांवर नव्हे तर फाटलेल्या कागदावर जेवण देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. लहान मुलं जमिनीवर बसून भात आणि भाजी खात आहेत, तर शिक्षक जवळ उभं राहून हे सर्व पाहत होते.
शेवपूर जिल्ह्यातील विजयपूर परिसरातील हुलपूर येथील सरकारी माध्यमिक शाळेत ही संतापजनक घटना घडली. शाळेतील लहान मुलांना नेहमीप्रमाणे मध्यान्ह भोजन दिलं जात होतं. परंतु ज्या पद्धतीने ते दिलं गेलं ते सर्वांसाठीच धक्कादायक आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतं की मुलांच्या समोर प्लेट नव्हत्या. पुस्तकांच्या पानांवर, फाटलेल्या कागदाच्या तुकड्यांवर त्यांना भात आणि भाजी दिली जात होती.
MP: बच्चों को कागज के टुकड़ों पर परोसा गया मिड-डे मील
— Priya singh (@priyarajputlive) November 7, 2025
बच्चों बड़े आराम से कागज के टुकड़ों पर परोसे गए चावल और सब्जी खा रहे हैं. शिक्षक तमाशबीन बने हुए हैं. MP सरकारी स्कूल की तस्वीर है. pic.twitter.com/DDGx3fJViY
शाळेच्या परिसरात मुलं जमिनीवर बसलेली पाहायला मिळत आहेत. ते त्यांना दिलेलं अन्न खात होती. शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचारी यावेळी लोक उपस्थित होते, परंतु कोणीही हे थांबवण्याचा किंवा ही परिस्थिती सुधारण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. जणू काही ही रोजचीच घटना आहे असं वाटत होतं.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या मध्यान्ह भोजन योजनेत सातत्याने निष्काळजीपणा केला जात आहे. कधीकधी मुलांना कमी शिजवलेलं अन्न दिलं जातं, तर कधीकधी त्यांना खाण्यासाठी प्लेट मिळत नाहीत. यावेळी कागदावर अन्न दिलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि शाळा प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे.