राहुल गांधी मणिपूरमध्ये दाखल; पोलिसांनी अडवला ताफा, पुढे सुरक्षित नसल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 01:47 PM2023-06-29T13:47:19+5:302023-06-29T13:59:16+5:30

राहुल गांधी यांचा ताफा बिष्णुपूर जिल्ह्यात थांबवण्यात आला आहे.

MP Rahul Gandhi enters Manipur; The police stopped the convoy, claiming that it was not safe to go ahead | राहुल गांधी मणिपूरमध्ये दाखल; पोलिसांनी अडवला ताफा, पुढे सुरक्षित नसल्याचा दावा

राहुल गांधी मणिपूरमध्ये दाखल; पोलिसांनी अडवला ताफा, पुढे सुरक्षित नसल्याचा दावा

googlenewsNext

नवी दिल्ली: मणिपुरमध्ये गेल्या काही दिवसापासून हिंसाचार सुरू आहे. आतापर्यंत या हिंसाचारात १२० जणांनी जीव गमावला आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज मणिपूरमध्ये दाखल झाले आहेत. राहुल गांधींचा आज आणि उद्या असा दोन दिवसीय मणिपूर दौरा आहे. यादरम्यान ते पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहे. इम्फाळपासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या विष्णुपूर जिल्ह्यात राहुल गांधींचा ताफा थांबवण्यात आला. 

पुढे सध्या अशांतता असून तिथे जाणं सुरक्षित नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. बिष्णुपूरचे एसपी म्हणाले की, राहुल गांधींसह कोणालाही पुढे जाऊ दिले जाऊ शकत नाही. त्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. सध्या तिकडे जाळपोळ झाली असून काल रात्रीही परिस्थिती बिकट होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते यापुढे काय निर्णय घेणार, पोलीस अधिकारी त्यांना पीडितांना भेटण्यासाठी पुढे जाऊन देणार की नाही?, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, राहुल गांधी जातीय संघर्षामुळे विस्थापित झालेल्या लोकांना मदत छावणीमध्ये भेटतील आणि नागरी समाज संघटनांशी संवाद साधतील. इम्फाळला पोहोचल्यानंतर ते प्रथम मदत छावणींना भेट देतील आणि नंतर काही नागरी संस्थांशी संवाद साधतील. राहुल गांधींचा चुराचंदपूर जिल्ह्याला भेट देण्याचा कार्यक्रम आहे, जिथे ते मदत छावणींना भेट देतील. त्यानंतर ते बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग येथे जाऊन विस्थापित लोकांशी संवाद साधतील. जातीय संघर्षानंतर, सुमारे ५०,००० लोक राज्यभरातील ३००हून अधिक मदत छावण्यांमध्ये राहत आहेत.

दरम्यान, मणिपूरमध्ये ३ मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून विरोधक राज्यातील परिस्थितीवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. विरोधी पक्ष केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. या पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यापूर्वी भेटीची वेळ मागितली होती. यानंतर सर्व पक्षांनी मिळून मणिपूरवर निवेदन दिले. या सर्व परिस्थितीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. बैठकीत गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आणि मणिपूरमधील परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल असे आश्वासन दिले.

Web Title: MP Rahul Gandhi enters Manipur; The police stopped the convoy, claiming that it was not safe to go ahead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.