पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:14 IST2025-05-03T16:12:16+5:302025-05-03T16:14:55+5:30
मध्य प्रदेशात एका व्यक्तीने पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली.

पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
MP Crime: मध्य प्रदेशातून हादरवणारे हत्याकांड समोर आलं आहे. एका व्यक्तीने पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह घरात पलंगाखाली पुरला होता. पण मृतदेह व्यवस्थित पुरला नसल्याने तिचा हात बाहेर आला आणि एकच खळबळ उडाली. पकडले जाऊ या भीतीने घाबरलेल्या पतीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालानंतर हत्येमागील कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बरवाह येथे लक्ष्मण नावाच्या व्यक्तीने त्याच्या चौथ्या पत्नीची हत्या केली. लक्ष्मणने पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह घरात पुरला होता. मृतदेहावर पलंग टाकून तो तीन दिवस त्याच्यावर झोपला देखील होता. मात्र मृतदेहाची बाहेर आल्याने लक्ष्मण घाबरला आणि पकडले जाण्याच्या भीतीने, त्याने कीटकनाशक प्यायले आणि आत्महत्या केली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.
४५ वर्षीय लक्ष्मणने सहा वर्षांपूर्वी रुक्मिणीशी चौथे लग्न केले होते. रुक्मिणीचेही हे तिसरे लग्न होते. दोघांचीही मुले त्यांच्या आधीच्या पती-पत्नीसोबत राहत होती. तर लक्ष्मण आणि रुक्मिणी यांना मूलबाळ नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण आणि रुक्मिणी दोघांनाही दारूचे व्यसन होते. यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. एकदा अचानक लक्ष्मण घराबाहेर पडला आणि त्याने शेजाऱ्यांना सांगितले की त्याने कीटकनाशक प्यायले आहे. गावकऱ्यांनी ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली पण तोपर्यंत लक्ष्मणचा मृत्यू झाला होता.
यानंतर पोलीस पुढील तपास करण्यासाठी लक्ष्मणच्या घरात पोहोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी लक्ष्मणच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना एक भयानक दृश्य दिसले. एका महिलेचा हात पलंगाच्या खालून बाहेर आला होता. घरातून खूप दुर्गंधी येत होती. पोलिसांनी ताबडतोब ती जागा खोदली. तिथे रुक्मिणीचा मृतदेह सापडला, जो तीन-चार दिवस जुना होता. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी लक्ष्मण तीन-चार दिवसांपासून त्या पलंगावर झोपत होता. घरात रुक्मिणीबाईंचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. ज्या रुक्मिणीचा हात सापडला तिथून पोलिसांनी तिचा पूर्ण मृतदेह खोदून बाहेर काढला. पत्नीची हत्या केल्यानंतर लक्ष्मणणे खड्डा खणला आणि त्यामध्ये मृतदेह पुरला. पण मृतदेह व्यवस्थित पुरला नसल्याने तिचा हात जमिनीबाहेर दिसत होता, ज्यामुळे दुर्गंधी येत होती. पकडले जाऊ या भीतीने लक्ष्मणने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे.