पाण्यात बुडणाऱ्या मुलीसाठी आईची धडपड; ५५ वर्षीय महिलेने थेट विहिरीत उडी मारली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:13 IST2026-03-04T17:07:36+5:302026-03-04T17:13:28+5:30
विहिरीत उडी घेणाऱ्या मुलीला वाचवण्यासाठी ५५ वर्षीय मातेने मृत्यूशी झुंज दिली.

पाण्यात बुडणाऱ्या मुलीसाठी आईची धडपड; ५५ वर्षीय महिलेने थेट विहिरीत उडी मारली अन्...
मुलीला वाचवण्यासाठी एका आईने धाडसी पाऊल उचलल्याची थरारक घटना तमिळनाडूतील नांबियूर जवळील ऐयनकट्टू थोट्टम येथे घडली आहे. आपल्या २७ वर्षीय दिव्यांग मुलीने विहिरीत उडी घेतल्याचे पाहताच, क्षणाचाही विलंब न लावता ५५ वर्षीय आईनेही पाण्यात उडी घेतली. तब्बल अर्धा तास मृत्यूशी दोन हात करत या माऊलीने आपल्या लेकीला पाण्यात तरंगते ठेवले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने दोघींचेही प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, ऊंजापालयम् येथील सुंदराम यांची २७ वर्षीय मुलगी दिव्या हिच्यावर गेल्या काही काळापासून उपचार सुरू होते. मंगळवारी वेत्तायमपालयम् परिसरातील एका खोल विहिरीजवळ दिव्या अचानक गेली आणि तिने थेट विहिरीत उडी घेतली. हे दृश्य पाहताच तिची आई मुथूमणी (५५ वर्षे) यांनी कोणताही विचार न करता लेकीला वाचवण्यासाठी विहिरीत झोकून दिले. विहीर पाण्याने तुडुंब भरलेली होती, मात्र मुथूमणी यांनी माघार घेतली नाही.
विहिरीत पडल्यानंतर मुथूमणी यांनी एका हाताने विहिरीतील दोरी पकडली आणि दुसऱ्या हाताने आपल्या लेकीला घट्ट धरून ठेवले. दोघींचेही नाक पाण्यावर राहील आणि श्वास घेता येईल याची काळजी घेत त्यांनी मदतीसाठी आवाज दिला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावून आले. त्यांनी तातडीने कडलूर पोलीस आणि नांबियूर अग्निशमन दलाला पाचारण केले.
अग्निशमन दलाचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले तेव्हा आई आणि मुलगी दोघीही थकल्या होत्या. जवानांनी तात्काळ दोरखंड आणि आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने विहिरीत उतरून अत्यंत शिताफीने दोघींनाही सुखरूप बाहेर काढले. विहिरीबाहेर येताच आई-लेकीला पाहून उपस्थित लोक भावूक झाले होते. "मुथूमणी यांचे धैर्य अफाट आहे. ५५ व्या वर्षी अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून लेकीला वाचवणे हे केवळ आईच करू शकते," अशा शब्दांत स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.
पोलिस तपास सुरू
या घटनेनंतर दोघींनाही प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दिव्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत कडलूर पोलीस अधिक तपास करत आहेत.