उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 07:16 IST2025-08-08T07:15:58+5:302025-08-08T07:16:29+5:30
माती-दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी आधुनिक उपकरणे या भागांत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, अनेक भागांत गंगोत्रीला जाणारे यात्रेकरूही अडकून पडल्याने त्यांच्या बचावासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे.

उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
डेहराडून : उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात धराली गावाजवळ मंगळवारी झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या महापुरामुळे अडकलेल्या ४००हून अधिक लोकांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले असून, १०० लोक अजूनही बेपत्ता आहेत. दरम्यान, हर्षिल भागात असलेल्या लष्करी छावणीतून बेपत्ता झालेले एक अधिकारी व आठ जवान अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
माती-दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी आधुनिक उपकरणे या भागांत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, अनेक भागांत गंगोत्रीला जाणारे यात्रेकरूही अडकून पडल्याने त्यांच्या बचावासाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. दगड-मातीचे ५० ते ६० फूट उंचीचे ढिगारे धरालीमध्ये असून, याखाली लोकांचा शोध घेतला जात आहे.
२२५ जणांचे बचाव पथक
बचावकार्यात अभियंते, वैद्यकीय कर्मचारी तसेच तज्ज्ञांसह २२५ जण सहभागी आहेत. तसेच अडकलेल्यांचा शोध घेण्याची क्षमता असलेले प्रशिक्षित श्वानही या भागात तैनात आहेत.
३०० यात्रेकरू सुरक्षित
ढगफुटीदरम्यान गंगोत्रीजवळ अडकलेल्या ३०० यात्रेकरूंना हेलिकॉप्टरच्या मदतीने हर्षिल भागात आणण्यात आले असून, हे यात्रेकरून सुरक्षित आहेत. यात गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीसह दक्षिणेतील यात्रेकरूंचा समावेश आहे.
मग महापूर आला कुठून?
ढगफुटीमुळे धरालीत प्रकोप झाल्याचे मानले जात असले तरी हवामान विभागाकडे असा डेटाच नाही. २० ते ३० चौ. किमी क्षेत्रात १ तासात १०० मिमीहून अधिक पाऊस हा ढगफुटी मानली जाते. परंतु, प्रत्यक्षात या भागात २७ मिमी पावसाचीच नोंद आहे. मग हा पूर आला कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.