Monkeypox : चिंताजनक! देशात आढळला दुसरा रुग्ण; कोरोनापेक्षा जास्त धोकादायक आहे का मंकीपॉक्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 19:09 IST2024-09-22T19:00:22+5:302024-09-22T19:09:05+5:30
Monkeypox : देशात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. दुबईहून केरळला परतलेल्या एका व्यक्तीला संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.

Monkeypox : चिंताजनक! देशात आढळला दुसरा रुग्ण; कोरोनापेक्षा जास्त धोकादायक आहे का मंकीपॉक्स?
देशात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. दुबईहून केरळला परतलेल्या एका व्यक्तीला संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. ३८ वर्षीय व्यक्तीवर मलप्पुरम जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. याआधी ९ सप्टेंबर रोजी देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता.
मंकीपॉक्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पाऊलं उचलली आहेत. मंकीपॉक्सची प्रकरणं रोखण्यासाठी राज्यांनी आरोग्यविषयक उपाययोजना कराव्यात, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला ग्लोबल पब्लिक हेल्थ इमर्जन्सी म्हणून घोषित केलं होतं. WHO ने हे घोषित करण्याची दोन वर्षांतील ही दुसरी वेळ आहे. मंकीपॉक्स आणि कोरोना व्हायरस वेगळे आहेत. त्याची लक्षणंही वेगळी आहेत.
कोरोना आणि मंकीपॉक्समध्ये 'हा' आहे फरक
कोरोना SARS-COV-2 मुळे होतो. तर मंकीपॉक्स हा पॉक्सविरिडे फॅमिलीतील ऑर्थोपॉक्स व्हायरस आहे. मंकीपॉक्सपेक्षा कोरोनाची लक्षणे अधिक गंभीर असू शकतात. तसेच कोरोना अधिक संसर्गजन्य आहे. कोरोना व्हायरस हा फुफ्फुसावर हल्ला करतो. मंकीपॉक्समुळे, शरीरावर पुरळ उठतात.
कोरोनाची लागण झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत लक्षणे दिसू शकतात. तर मंकीपॉक्सची लागण झाल्यास २१ दिवसांच्या आत लक्षणे दिसतात. कोरोनाची लागण झालेले लोक ४ ते ५ दिवसात बरे होऊ शकतात. त्याच वेळी, जर एखाद्या व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली असेल तर त्याला बरे होण्यासाठी २ ते ४ आठवडे लागू शकतात.
मंकीपॉक्स किती धोकादायक?
मंकीपॉक्स हा आजार नक्कीच वेदनादायक आहे, पण हा कोरोनासारखा वेगाने पसरणारा आजार नाही. ज्या लोकांना यापूर्वी स्मॉलपॉक्सची लस मिळाली आहे त्यांना त्याचा संसर्ग होण्याचा फारसा धोका नाही. मंकीपॉक्समध्ये मृत्यू दर जास्त नसतो. बहुतेक रुग्ण दोन ते चार आठवड्यांत बरे होतात.