molestation at the Metro station with women; Travelers ignore help | मेट्रो स्थानकावर तरुणीसमोर अश्लील कृत्य; प्रवाशांनी केले मदतीकडे दुर्लक्ष
मेट्रो स्थानकावर तरुणीसमोर अश्लील कृत्य; प्रवाशांनी केले मदतीकडे दुर्लक्ष

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये निर्भया बलात्काराचे एवढे मोठे प्रकरण घडूनही देशात महिला सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुग्राममधील हुडा सिटी सेंटर मेट्रो स्टेशनवर एका व्यक्तीने 29 वर्षीय तरुणीसमोर अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तरुणीने या व्यक्तीच्या कानशिलात लगावूनही शेजारील प्रवाशांनी दुर्लक्ष केल्याचेही समोर आले आहे. 


तरुणीने सांगितले की, हा व्यक्ती तिच्याकडे पाहत अश्लील कृत्य करत होता. यावेळी त्याच्या कानाखाली लगावले, तेव्हा त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. यामुळे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आरडा-ओरडा केला. पण तेथील प्रवासी पाहून पुढे जात होते. कोणीही मदतीसाठी आले नसल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. यानंतर ही तरुणी घाबरून घरी आली. हे प्रकरण 14 जूनच्या रात्रीचे आहे. 


या पीडित तरुणीने हा घटनाक्रम सोशल मिडीयावर सांगितल्याने हा प्रकार उघड झाला. यानंतर गुरुग्राम पोलिसांनी या व्यक्तीचा तपास केला असून पुढील कारवाई सुरु केली आहे. मात्र, तरुणीने पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला आहे. 
ही तरुणी दिल्लीची रहिवासी असून गुरुग्राम शहरातील एक कंपनीमध्ये व्यवस्थापक आहे. या प्रकरणी ती गुन्हा दाखल करणार आहे. सीसीटीव्ही फुटेज मिळूनही सोमवारी दुपारपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. 


हुडा सिटी मेट्रो स्थानकावर यलो लाईनवरून उतरल्यानंतर बाहेर पडण्याचा मार्गाने जात होती. एस्कलेटरवर आल्यानंतर तिला कोणीतरी पाठलाग करत असल्याचा भास झाला. 14 जूनच्या रात्री 9.25 मिनिटांनी हा प्रकार घडला. प्रवाशांची संख्याही जास्त होती. हा व्यक्ती तिच्याकडे सारखा पाहत होता. त्याच्याकडे सुरुवातीला तरुणीने दुर्लक्ष केले. मात्र, काही वेळीतच त्याने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. यामुळे त्याला रोखण्यासाठी तरुणीने कानाखाली मारली. यावेळी तिथे महिलाही होत्या. मात्र, कोणीही पुढे आले नाही, असे या तरुणीने सांगितले. 


Web Title: molestation at the Metro station with women; Travelers ignore help
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.