मोईन कुरेशी प्रकरणातील तपास अधिकारी बदलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 04:14 IST2018-10-30T04:13:42+5:302018-10-30T04:14:11+5:30
या प्रकरणात आता एस. किरण यांच्या जागेवर सतीश डागर हे तपास करणार आहेत.

मोईन कुरेशी प्रकरणातील तपास अधिकारी बदलला
नवी दिल्ली : सीबीआयमधील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपानंतर व त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर आता व्यावसायिक मोईन कुरेशी प्रकरणातील तपास अधिकारी (आयओ) बदलण्यात आला आहे. या प्रकरणात आता एस. किरण यांच्या जागेवर सतीश डागर हे तपास करणार आहेत.
सीबीआयमध्ये त्या रात्री घडलेल्या घडामोडीत जे अधिकारी हजर होते त्यातील डागर एक आहेत. अस्थाना यांच्याविरुद्ध लाचेची जी तक्रार आहे त्याचा तपास डागर यांच्याकडे होता. मात्र, आता ते कुरेशी प्रकरणाचा तपास करणार आहेत. डागर यांनी शुक्रवारी सतीश साना या हैदराबादेतील व्यवसायिकाला समन्स जारी केले आहेत. त्यांच्या जबाबावरुन अस्थाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सीबीआयमधील घडामोडींचे केंद्र म्हणून कुरेशी प्रकरणाकडे बघितले जात आहे. (वृत्तसंस्था)
राव यांच्या पत्नीने कंपनीला दिले १ कोटी
सरकारने एम. नागेश्वर राव यांना सीबीआयचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. असा खुलासा झाला आहे की, राव यांच्या पत्नी संध्या आणि कोलकाता येथील ट्रेडिंग कंपनी एंजेला मर्कन्टाइल प्रा. लि. दरम्यान आर्थिक वर्ष २०११ ते २०१४ च्या दरम्यान अनेकदा पैशांची देवाण घेवाण झाली आहे.
संध्या यांनी कंपनीला कर्जाच्या स्वरुपात पैसे दिले. २०१२ ते २०१४ च्या दरम्यान संध्या यांनी तीन वेळा कंपनीला १.१४ कोटी रुपये दिले होते.