मोहम्मदपूरचं मोहनपूर, खलीलपूरचं रामपूर; मुख्यमंत्री यादवांनी ११ गावांच्या नामांतराची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:42 IST2025-01-13T13:40:04+5:302025-01-13T13:42:38+5:30

Madhya Pradesh News: एका कार्यक्रमात बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यातील ११ गावांचे नामांतर करण्याची घोषणा केली. 

Mohammadpur to Mohanpur, Khalilpur to Rampur; Chief Minister Yadav announces renaming of 11 villages | मोहम्मदपूरचं मोहनपूर, खलीलपूरचं रामपूर; मुख्यमंत्री यादवांनी ११ गावांच्या नामांतराची केली घोषणा

मोहम्मदपूरचं मोहनपूर, खलीलपूरचं रामपूर; मुख्यमंत्री यादवांनी ११ गावांच्या नामांतराची केली घोषणा

Madhya Pradesh Latest News: मध्य प्रदेशातील शाहपूर जिल्ह्यात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री मोहन यादव हजर होते. यावेळी गावकऱ्यांनी गावांची नावे बदलण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्‍यांनी लागलीच गावांच्या नामांतराची घोषणा करत आदेश दिले असल्याचे सांगितले. मध्य प्रदेशातील ११ गावांची नावे बदलण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यादव यांनी केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुख्यमंत्री मोहन यादव हे शाहपूर जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमाला हजर होते. यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्याकडे गावांची नावे बदलण्यात यावीत, अशी मागणी केली. त्यावर १२ जानेवारी रोजीच ११ गावांच्या नामांतराचे आदेश दिले गेले आहेत, असे मुख्यमंत्री यादव यांनी जाहीर केले. 

मध्य प्रदेशातील कोणत्या गावांची नावे बदलली जाणार?

मोहम्मदपूर मछनाई - मोहनपूर

ढाबला हुसैनपूर  - ढाबला राम

मोहम्मदपूर पवाडिया - रामपूर पवाडिया

खजूरी अलाहदाद - खजुरी राम

हाजीपूर - हिरापूर गाव

निपानिया हिसामुद्दीन - निपानिया देव

रिछडी मुरादाबाद - रिछडी

खलीलपूर - रामपूर 

घट्टी मुख्तयारपूर - घट्टी

उंचोद - उंचावद

शेखपूर बोंगी - अवधपूरी

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री यादव म्हणाले की, 'गावांची आणि शहरांची नावे जनभावनेनुसार ठरवली जातील. लोकांची मागणी होती, त्यामुळेच नावे बदलण्यात आली आहेत.'

मोहम्मदपूरमध्ये एकही मोहम्मद नाही, तर मोहम्मदपूर कसे?

मुख्यमंत्री यादव म्हणाले, "तुम्ही म्हणालात की काही नावे अडखळल्यासारखी वाटतातं. वेगळी वाटतात. तर मग काही चूक तर करत नाहीये ना? जर मोहम्मदपूर मछनाईमध्ये एकही मोहम्मद नसेल, तर मोहम्मदपूर नाव कसे? जर कुणी मुस्लीम बांधव तिथे राहत असेल, तर नाव असावं. त्यामुळे या गावाचं नाव बदलून आता मोहनपूर करण्यात आले आहे."

आठवड्यापूर्वी बदलण्यात आले तीन गावांची नावे

मध्य प्रदेशातील तीन गावांची नावे ६ जानेवारी २०२५ रोजीच बदलण्यात आली आहेत. उज्जैनमधील मौलाना, गजनीखेडी आणि जहांगीरपूर या गावांचे नामांतर करण्यात आले आहे. 

"मौलाना गावाचे नाव लिहिताना पेन अडखळतो, त्यामुळे हे गाव आता विक्रम नगर नावाने ओळखले जाईल", असे मुख्यमंत्री यादव म्हणाले. मध्य प्रदेश सरकारने जहांगीरपूर गावाचे नाव बदलून जगदीशपूर, तर गजनीखेडी गावाचे नाव बदलून चामुंडा माता नगरी असे केले आहे. 

Web Title: Mohammadpur to Mohanpur, Khalilpur to Rampur; Chief Minister Yadav announces renaming of 11 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.