मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 13:28 IST2025-10-30T13:27:58+5:302025-10-30T13:28:57+5:30
Mohammad Azharuddin Congress Politics: २००९च्या विजयानंतर अझरूद्दीनला राजकीय क्षेत्रात फारसे यश मिळाले नाही

मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
Mohammad Azharuddin Congress Politics: माजी भारतीय क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनची काँग्रेस पक्षातील वट वाढत आहे. अझरूद्दीन लवकरच तेलंगणा सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्याला मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाणार आहे. अझहरच्या नियुक्तीमुळे तेलंगणा मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या १६ होणार आहे. तरीही मंत्रिमंडळातील दोन पदे रिक्त राहतील. अझहरला यापूर्वी २०१८ मध्ये तेलंगणा काँग्रेस राज्य समितीचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. २००९ मध्ये अझहर मुरादाबादमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २०१४च्या लोकसभा निवडणुकीत आणि २०२३च्या विधानसभा निवडणुकीत तो पराभूत झाला. पण तरीही काँग्रेस पक्ष अजहरच्या इतका 'मेहेरबान' का, याबाबत चर्चा रंगली आहे.
अझरूद्दीनची राजकीय कामगिरी फारशी चमकदार नाही...
२००९ मध्ये अझहरने राजकारणात प्रवेश केला. काँग्रेसने त्याला उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले. तो पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर २०१४मध्ये काँग्रेसने त्याला राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर मतदारसंघातून तिकीट दिले, जिथे तो पराभूत झाला. त्यानंतर २०१८मध्ये त्याला तेलंगणा काँग्रेस राज्य समितीचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर २०२३मध्ये त्याने ज्युबिली हिल्स मतदारसंघातून तेलंगणा विधानसभा निवडणूक लढवली, जिथेही त्याचा पराभव झाला.
तेलंगणामध्ये अझरूद्दीनवर 'मेहेरबानी' का?
तेलंगणातील काँग्रेस पक्षात अझरूद्दीनशिवाय एकही बडा मुस्लिम व्यक्ती नाही. सध्या पक्षाकडे एकही मुस्लिम आमदार किंवा कॅबिनेट मंत्री नाही. त्यामुळे त्याचा समावेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरतो. ज्युबिली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीच्या अगदी आधी अझरचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. या मतदारसंघातील मतदारांचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या मुस्लिम मतदारांमध्ये काँग्रेसचे आकर्षण वाढवण्याचा प्रयत्न म्हणून या हालचालीकडे पाहिले जात आहे.